कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. दरम्यान, काँग्रेसने कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपद डीके शिवकुमार यांच्याकडे सोपवले आहे. सध्या काँग्रेस पक्ष जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत आहेत. असे असतानाच भाजपाचे आमदार बसनागौडा पाटील यत्नल यांनी मोठा दावा केला आहे. आगामी काळात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार एकमेकांना चपलेने मारतील. हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकरणार नाही, असे यत्नल म्हणाले आहेत.
यत्नल नेमके काय म्हणाले?
२३ जून रोजी डीके शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते सवराज बोम्मई यांची भेट घेतली. याच भेटीचा आधार घेत काँग्रेसमधील कर्नाटकचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार नाही, असा दावा यत्नल यांनी केला. “डीके शिवकुमार काँग्रेसच्या हायकमांडला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी बोम्मई यांची भेट घेतली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रीपद न दिल्यास मी भाजपात जाऊ शकतो, असा संदेश डीके शिवकुमार यांना या भेटीच्या माध्यमातून द्यायचा होता. भविष्यात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन नेते एकमेकांना चपलेने मारतील. हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळणार आहे. सिद्धरामय्या यांचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही,” असा दावा यत्नल यांनी केला.
शिवकुमार यांनी घेतली बोम्मई यांची भेट
२३ जून रोजी डी के शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच एकमेकांशी हस्तांदोलन केले. या भेटीवरही यत्नल यांनी भाष्य केले. “डीके शिवकुमार यांना सोबत घेऊ नये. डीके शिवकुमार तुमच्याशी हातमिळवणी करतील आणि मुख्यमंत्री होतील, असे मी बोम्मई यांना सांगितले आहे,” अशी माहिती यत्नल यांनी दिली.
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे? यावर काँग्रेसमध्ये खल
दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे? या प्रश्नावर काँग्रेसमध्ये चांगलाच खल चालला होता. डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांची नेमणूक केली. त्यानंतर २० मे रोजी या दोघांचा शपथविधी सोहला पार पडला होता. काँग्रेसने या निवडणुकीत २२४ पैकी एकूण १३५ जागांवर विजय मिळवला होता. बहुमताच आकडा पार केल्यामुळे येथे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.