मालेगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची आशा मावळल्यानंतर बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटातील या घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.
बच्छाव यांची पालकमंत्री दादा भुसे यांचे खंदे समर्थक म्हणून एकेकाळी ओळख होती. परंतु, मधल्या काळात दोघांमध्ये कुठल्यातरी कारणास्तव बिनसले. भुसेंपासून दुरावलेल्या बच्छाव यांनी सर्वच पक्षांपासून अंतर राखत बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून मालेगाव शहरासह तालुक्यात काम सुरू ठेवले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. पाठोपाठ काही कारणास्तव आपण पक्षापासून काही काळ अलिप्त होतो हे खरे, परंतु पक्ष सोडून गेलो नव्हतो, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. आता आपण पक्षात सक्रिय झालो असून येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून ‘मालेगाव बाह्य’मध्ये उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे ते म्हणाले होते. पक्षाकडून उपनेते अद्वय हिरे किंवा आपणास दोघांपैकी ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली जाईल, असेही बच्छाव यांनी नमूद केले होते.
आणखी वाचा-Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?
दुसरीकडे, जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी तब्बल नऊ महिने कारागृहात काढावे लागलेले हिरे यांना बच्छाव यांनी उमेदवारीसाठी दावेदारी जाहीर केली आणि योगायोगाने उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ते कारागृहाबाहेर आले. वर्षभरापूर्वी भाजपचा त्याग करून हिरे ठाकरे गटात दाखल झाले होते. त्यावेळी झालेल्या प्रवेश सोहळ्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून हिरे हे एकमेव दावेदार असल्याचा दावा या गटाकडून केला गेला. उपनेते या नात्याने इतरांची पक्षीय उमेदवारी पक्की करणाऱ्या प्रक्रियेचा आपण भाग आहोत, त्यामुळे आपल्या उमेदवारीची कुणी चिंता करू नये, असा टोला खुद्द हिरे यांनी हाणला होता. त्यांचा हा रोख अर्थातच बच्छाव यांच्या दिशेने होता.
बच्छाव आणि राऊत यांची भेट घडवून आणण्यासाठी ठाकरे गटाचे तत्कालीन मालेगाव तालुकाप्रमुख रामा मिस्तरी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. या पार्श्वभूमीनंतर गेल्या आठवड्यात मिस्तरी यांची तालुका प्रमुख पदावरून अचानक उचलबांगडी केली गेली. यामुळे नाराज झालेल्या मिस्तरी यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत अद्वय हिरे यांना लक्ष्य केले. शिवसेनेत फूट पडल्यावर बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यानी पालकमंत्री दादा भुसे यांना साथ देत शिंदे गटाला आपलेसे केले, तरीही ठाकरेंवरील निष्ठा आपण ढळू दिली नाही. असे असताना ‘आयाराम-गयाराम’लोकांसाठी आपल्याला पक्षाबाहेर जावे लागले याचे दु:ख वाटते, अशी व्यथा मिस्तरी यांनी व्यक्त केली होती.
बच्छाव यांनी उमेदवारीसाठी केलेली दावेदारी, या दावेदारीची मिस्तरी यांनी एकप्रकारे केलेली भलामण या घटनाक्रमाची किनार त्यांच्या उचलबांगडीच्या निर्णयाला असल्याचे म्हटले जाते. यानिमित्ताने हिरे यांचे पक्षातील महत्व आणि त्यांच्या शब्दाला वजन असल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असणाऱ्या बच्छाव यांचा मुखभंग झाल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या बच्छाव यांना अपक्ष लढण्याच्या पर्याय आहे. त्यादृष्टीने बच्छाव यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यासाठीची औपचारिकता म्हणून या महिन्याच्या अखेरीस समर्थकांचा मेळावा त्यांनी आयोजित केला आहे. मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करतानाच निवडणुकीची रणनीतीदेखील आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, थेट लढतीत संघर्ष करावा लागण्याची भीती असलेले दादा भुसे यांच्यासाठी ठाकरे गटातील घडामोडी निश्चितच दिलासादायक म्हणाव्या लागतील. विरोधी मतांची होणारी फाटाफुट त्यांच्यासाठी लाभदायकच ठरणार आहे.