परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवले आहे. ऊस, सोयाबीन, फळे आणि भाजीपाला या नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भात, तेलबिया यांनाही याचा फटका बसला आहे. हजारो हेक्टर पिकांची नासाडी झाली असताना त्याचा अचूक अंदाज येण्यास काही अवधी जावा लागणार असल्याचे मंत्री, अधिकारी सांगत आहेत. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांचा अनुभव बरा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिवाळी काळी ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सुरुवात चांगली केली. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने त्यावर पाणी फेरले आहे. पुढील हंगामापर्यंत सालबेगमी कशी करायची याचा घोर भूमिपुत्रांना लागला आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे उसाचा पट्टा. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांत साखर उद्योग स्थिरावला आहे. ऊस पिकाची उगवण चांगली झाली होती.

हेही वाचा- शिवारात चिखल, हतबलतेची परिसीमा; मराठवाड्यातील ५५ टक्के पीक पाण्यात

उसाचा गोडवा हरपला

सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली आहे. काळे ढग, अधूनमधून येणारा पाऊस यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. उसाच्या वजनामध्ये घट होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. कारखान्यांनी गाळपाची तयारी केली असली तरी शेतात सर्वत्र पाणी असल्यामुळे ऊस तोडणी कशी करायची याचा पेच निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त होईल असे प्राथमिक क्षेत्र आहे. ऊस वेळेवर गाळप न झाल्यास त्याचे काय करायचे, याची चिंता आतापासूनच होऊ लागली आहे.

भात उत्पादकांना दुहेरी अडचण

नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील सह्याद्रीच्या कुशीत घाटालगतच्या भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परतीचा पाऊस अधिक काळ लांबल्याने या भात शेतीसह नागली, वरई, उडीद पिकेही धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले भात पीक पूर्णपणे भिजले. खाचरे तुडुंब भरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतेक ठिकाणी भात कापणी यंत्राने केली जाते. भात शेतीमध्ये पाणी, ओलावा असल्याने कापणी यंत्र काम करीत नसल्याने मजूर हाच पर्याय असला तरी मजूर मिळण्यात अडचण असल्याने तो प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे.

हेही वाचा- विदर्भात खरीप हंगामातील ६० टक्के पीक अतिवृष्टीने उद्ध्वस्त

सोयाबीन कुजले; दरही घटले

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन. राज्यांच्या तुलनेने येथील सोयाबीनचे उत्पादन अधिक आहे. शेतात सोयाबीनची गंजी लावून ठेवली आहे. निम्म्यापेक्षा अधिक सोयाबीन खराब झाली आहे. त्याची प्रतवारी खराब झाल्याने दर मिळत नाही. सोयाबीनला ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता असली तरी त्याचा फायदा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

द्राक्ष, स्ट्रॉबेरी बागांची नासाडी पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला द्राक्षाचा गोडवा अलीकडे चाखायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यात हे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. काढणीला आलेल्या द्राक्ष पिकाला पावसाचा फटका बसला आहे. सप्टेंबरअखेर फळछाटणी झालेल्या द्राक्षाची पोंगा अवस्था असल्याने बुरशीजन्य रोगामुळे घडच जिरले आहेत. कळी व फुलोऱ्यातील बागा दावण्याला बळी पडल्या आणि त्यापुढे गेलेल्या बागामध्ये घडकुज झाली आहे. हीच स्थिती डाळिंबाच्या मृग बहराची झाली आहे. यामुळे कोट्यवधींची हानी झाली असून यातून कसे सावरायचे याची चिंता लागली आहे. द्राक्ष बागा नुकसानीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरातील आहे. आता कुजलेले पीक बाजूला काढून शेत स्वच्छ करण्याचा खर्चही अंगावर पडलेला आहे. थंड हवेचे केंद्र असलेल्या महाबळेश्वर हे आता स्ट्रॉबेरी शेतीसाठीही ख्यातनाम आहे. परतीच्या मुसळधार पावसाने कमी उंचीची ही शेती पूर्णतः पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, शेतात आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने शेतमजुरांना सध्या कामे नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आहे.

पीकविमा निराशाजनक

शेती मालाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविणे अपेक्षित असते. शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यावर परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात आहे. मागील वर्षी तक्रार करूनदेखील विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे योजनेचा फायदा नेमका कोणाला, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अस्मानी – सुलतानी संकटाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेने ग्रासला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to cash crops in western maharashtra due to heavy rains print politics news dpj