वांशिक संघर्षानी ग्रासलेल्या परिस्थितीशी सामना करणारे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी (दि. २५ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. मणिपूरमध्ये सामान्य परिस्थिती आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उभय नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर बिरेन शाह यांनी ट्वीट करत सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती सुधारत असल्याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. “अमित शाह यांच्या देखरेखीखाली मागच्या काही आठवड्यात राज्य आणि केंद्राने हिंसाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. १३ जून पासून हिंसाचारामुळे कोणालाही इजा झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया बिरेन सिंह यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिरेन सिंह पुढे म्हणाले की, मणिपूरमध्ये सामान्य परिस्थिती लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रयत्न करेल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे. याशिवाय, शांतता चिरकाळ टिकून राहावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना शाह यांनी केली. तसेच मणिपूरमध्ये शांतता नांदावी यासाठी राज्यातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला भाजपा मणिपूर प्रदेशचे प्रभारी संबित पात्रा, राज्यसभा खासदार आणि मणिपूरचे नामधारी राजे महाराजा सनाजाओबा लेशेम्बा आणि राज्य विधानसभेचे नवे अध्यक्ष थोकचोम सत्यब्रत सिंह उपस्थित असल्याचेही बिरेन सिंह यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये शांतता नांदावी यासाठी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला १८ पक्षांचे पुढारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पक्षपाती कारभार केला असल्याचा आरोप अनेकांनी केला. विरोधकांच्या बैठकीला मणिपूरचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. तसेच बैठकीत विरोधी पक्षांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आणि राज्यात ऐक्य प्रस्थापित करण्याची मागणी केली. तसेच विरोधी पक्षाचे एक शिष्टमंडळ इंफाळला पाठविण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला, जेणेकरून लोकांचा आत्मविश्वास परत मिळवता येईल.

अमित शाह विरोधकांच्या बैठकीत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सर्वांना सोबत घेऊन मणिपूरचा प्रश्न सोडविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या बैठकीत अनेकांनी मागणी केली की, निहित वेळेत हा प्रश्न सोडविला गेला पाहीजे. राज्यात शांतता आणि सामान्य वातावरण जलदगतीने कसे होईल, यासाठी प्रयत्न केले करायला हवेत. विरोधकांच्या सूचना खुल्या मनाने केंद्र सरकार स्वीकारेल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day after all party meeting on manipur clashes cm biren meets amit shah kvg