मुंबई : अर्थसंकल्प सादर करताना तुकोबांच्या अभंगाचे दाखले देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी पक्षाच्या आमदारांसह प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले. सारी विघ्ने दूर होऊन पुन्हा सत्ता मिळावी, अशीच प्रार्थना केल्याची चर्चा आहे. राज्यातील नेतेमंडळी मंदिरांना भेटी किंवा बाबाबुवांकडे जाणे नवीन नाही. पण याला पवार कुटुंबीय अपवाद होते.
हेही वाचा >>> भायखळ्याला यंदाही नवीन आमदार?
अजित पवार यांनी सादर केलेल्या नऊ अर्थसंकल्पांमध्ये कधीच अभंगाचा दाखला दिला नव्हता. पण यंदा प्रथमच तुकोबाचा अभंग अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला व अखेरीस सादर केला. तसेच पुंडलिक वरदे हा जयघोषही केला. दोनच दिवसांपूर्वी अजित पवार हे सपत्निक वारीत सहभागी झाले होते. आज पक्षाच्या आमदारांसह बसमधून थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेले. तेथे आमदारांसह गणरायाचे दर्शन घेतले. पूजाअर्जा केली. निवडणुकीत यश मिळावे यासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. भाजपच्या संगतीत अजित पवार बदलले आणि देवभक्त झाले, अशीच प्रतिक्रिया विधान भवनात होती. विधानसभेसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील रणनीतीकारांची त्यांनी मदत घेतली आहे.