शिंदे-फडणवीस सरकारमधले मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे आरोप केले. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सोमवारीही विरोधक आणि खासकरून अजित पवार आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले होते. आता आज पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांना अधिवेशनात लक्ष्य करण्यात आलं. टीईटी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उत्तर द्यायला उभे राहिले आणि मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही असं म्हणत खोचक टोला लगावला.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
या राज्यातल्या लाखो तरूणांना बुडवणारा हा टीईटी घोटाळा यांच्या काळात (महाविकास आघाडी) झाला आहे. या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक त्या टीईटी घोटाळ्यात लिप्प होते. यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत गेले. मंत्रालयातले अधिकारी या घोटाळ्यात अटक झाले. आता या घोटाळ्यावरून आमचे सन्मानीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले जात आहेत. अब्दुल सत्तारांवर जो आरोप केला जातो आहे त्यात मी सांगेन त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही.
एक नवी पद्धत सुरू झाली आहे की कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे आणि निघून जायचं. दिवसभर मीडियात तेच चालवत राहायचं. पण या असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. त्या आरोपांना तसंच आम्ही देऊ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल जो सत्ताकाळातल्या गोष्टी भ्रष्टाचार म्हणून बाहेर आणतो आहे. वरून आदेश आहे मला माहित आहे की बॉम्ब बॉम्ब म्हणत होते पण लवंगी फटाकाही सापडला नाही. सभात्याग करणाऱ्यांनी मला उत्तर द्यावं की टीईटी घोटाळा कसा झाला? लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चुरडण्याचं काम कुणी केलं? अपात्र कंपन्यांना पात्र करण्याचं काम कुणी केलं? असेही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.
“टीईटी घोटाळ्यावरून अब्दुल सत्तारांवर आरोप करण्यात येत आहे. पण, त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे. पण, कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करून निघून जायचं. मात्र, आम्ही सोडणार नाही, तसेच उत्तर देऊ,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.
काय आहे टीईटी घोटाळयाचं प्रकरण?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. आरोग्य भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच हा शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोटाळा उघडकीस आला होता.
टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानं राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या घोटाळ्यात राज्य परीक्षा परिषदेचे बडे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्यांच्या संचालकांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची यादीच पोलिसांनी तयारी केली आहे