Battles of Veterans in Vidarbha Politics: विदर्भात सध्या विरोधी पक्षनेतेपद, उपमुख्यमंत्री आणि भाजप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून हे सर्व प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभेच्या ६२ जागा असलेल्या विदर्भातून राज्यातील सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचणे शक्य असल्याने येथील सर्वपक्षीय बड्या नेत्यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. भाजपने येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे यांच्या माध्यमातून कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीला सहाव्यांदा सामोरे जात आहेत. तर ते दक्षिण-पश्चिम नागपूरमधून चौध्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील साकोलीमधून निवडणूक लढत आहे. भाजपने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी प्रदेश सचिव व जि.प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांना संधी दिली आहे.
हेही वाचा >>> जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे संतोषसिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. गावातूरे यांचे आव्हान आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये शिवसेनेचे (शिंदे) मंत्री संजय राठोड यांच्यासमोर काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात चुरस आहे. अहेरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार ) मंत्री धर्मराव बाबा आत्राम रिंगणात आहेत.च्त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम रिंगणात आहे. उत्तर नागपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मैदानात आहेत. त्यांना भाजपचे डॉ. मिलिंद माने, बसपचे मनोज सांगोळे आणि अपक्ष अतुल खोब्रागडे यांचे आव्हान आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध भाजपचे राजेश वानखेडे लढत आहेत. याशिवाय येथे बहुजन समाज पार्टी आणि बहुजन वंचित आघाडीही मैदानात आहे.
हेही वाचा >>> ‘आम्ही काहीही करू शकतो’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मिथुन चक्रवर्तींची मुस्लिमांना धमकी
माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुत्र सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) काटोलमधून मैदानात उतरवले आहे. त्यांची लढत भाजपचे चरणसिंह ठाकुर आणि युवक काँग्रेसचे बंडखोर याज्ञवल्क्य जिचकार यांच्याशी आहे.
माजी मंत्री सुनील केदार यांनी पत्नी अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी दिली आहे. त्यांना भाजपचे डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष डॉ. अमोल देशमुख या दोन भावांचे आव्हान आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार शशिकांत खेडेकर, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथून माजी मंत्री बच्चू कडू विरुद्ध काँग्रेसचे बबलू देशमुख, बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना (शिंदे)आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शिवसेना (ठाकरे) जयश्री शेळके, वरोरा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे करण देवतळे आहेत. गोंदियात काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल मैदानात आहेत.
रामटेक सर्वाधिक चर्चेत
काँग्रेसचे माजी मंत्री व नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी महाविकास आघाडीविरुद्ध बंडखोरी केली आहे. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक मदारसंघात ताकद पणाला लावत असून त्यांची लढत शिवसेनेचे (शिंदे) आमदार ॲड. आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे (ठाकरे) विशाल बरबटे यांच्याशी आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रामटेकची जागा जिंकली आहे.
रवी राणांसमोर बंडखोरांचे आव्हान राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीचे आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. राणा यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे) सुनील खराते रिंगणात आहे. तर भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांचेही राणा समोर भक्कम आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्या पराभव झाला.