अलिबाग : रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेण्यात आलेला निर्णय मनाला न पटणारा असल्याची प्रतिक्रीया राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपद मला मिळेल अशी अपेक्षा होती असेही ते म्हणाले.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेण्यात आलेला निर्णय धक्कादायक आहे. असा निर्णय घेतला जाईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या तीन अशा सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री पदी नको असे सांगितले होते. जिल्ह्यात सर्वांनाच मला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. याचे वाईट वाटत आहे. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले. या निर्णयानंतर शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद हे तत्कालिक कारण ठरले होते. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री झाल्याने, शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.