मालेगाव : अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. पारंपरिक विरोधक तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भुसे यांना धूळ चारण्याची किमया केली. जेमतेम सव्वा वर्षात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि त्याआधी होणाऱ्या मालेगाव महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पराभव भुसेंसाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. तद्वतच शिवसेनेतील बंडाप्रसंगी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भुसे यांचे एकनाथ शिंदे गटात दाखल होणे ही बाबही लोकांना रुचली नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकमंत्री भुसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे या दोन गटांमध्ये समितीच्या निवडणुकीसाठी सामना रंगला. दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. लढविलेल्या १५ पैकी १४ जागांवर यश संपादन करुन हिरे गटाने भुसेंना धोबीपछाड दिला. दुसरीकडे सर्व १८ जागा लढविणाऱ्या भुसे गटाची अवघ्या तीन जागा मिळविताना दमछाक झाली. या गटास १५ जागांवर दारुण पराभव पत्कारावा लागला आहे. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत हिरे यांनी समितीतले मागचे सर्व राजकीय हिशेब चुकते केले, हेच सिद्ध होत आहे.

हेही वाचा – “जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा

पहिल्या परीक्षेत हिरे उत्तीर्ण

ठाकरे घराण्याचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे दादा भुसे हे शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे मालेगावमध्ये भुसेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाने भाजपचे अद्वय हिरे यांना गळाला लावले. एवढेच नव्हे तर, हिरेंचे राजकीय महत्व वाढावे आणि चांगले पाठबळही मिळावे म्हणून पक्षाच्या उपनेते पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ठाकरे-शिंदे वादात पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गेल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या खेडनंतर दुसरी सभा मालेगावात घेतली. महिन्याभरापूर्वी झालेल्या या सभेस लाखभर लोक उपस्थित राहिल्याने ठाकरे गटाचा उत्साह द्विगुणित झाला होता. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भुसे यांना अस्मान दाखविण्याचा निर्धार सभेत केला गेला. त्यानंतर लगेचच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाने हा निर्धार खरा करुन दाखवला आहे. पक्षांतरानंतर पार पडलेली ही निवडणूक हिरेंच्या दृष्टीने जणू परीक्षाच होती. त्याअर्थी बाजार समितीमधील भुसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावत हिरे हे या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, असेच म्हणावे लागेल.

गेली दहा वर्षे समितीत भुसे गटाची सत्ता होती. मात्र समितीमधील कारभार फार समाधानकारक झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला. बाजार समिती आवारात किमान सोयी-सुविधांची पदोपदी वानवा दिसते. पावसाळ्याच्या दिवसात तर शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांवर अक्षरशः चिखल तुडविण्याची वेळ येते. शासनाने आडत बंद केली तरी येथील काही व्यापारी वेगळ्या पद्धतीने वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यास थेट घरी जाऊन मारहाण करण्यापर्यंत मजल गेल्याचा प्रकार मध्यंतरी घडला होता. शेतमाल खरेदी करणारे व्यापारी परागंदा झाल्याने हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली. हे पैसे मिळण्यासाठी अजूनही काही शेतकरी आस लावून बसले आहेत. समितीतील काही कर्मचारी वर्षानुवर्ष मानधनावर काम करीत असताना संचालकांच्या नातेवाईकांची कायमस्वरुपी नोकरीत वर्णी लावली गेली. समितीतल्या कारभाऱ्यांचा या व अशा प्रकारच्या वादग्रस्त कारभाराबद्दल लोकांमध्ये रोष होता. मतपेटीतून तो व्यक्त झाल्याचे दिसले. त्यातून समितीचे सभापती, उपसभापती व संचालक राहिलेल्या मातब्बर भुसे समर्थकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला.

हेही वाचा – कर्नाटकमध्ये प्रचार शिगेला! काँग्रेसकडून भाजपाविरोधात #CryPMPayCm मोहीम

हिरे-भुजबळांची दिलजमाई

अद्वय हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राजकीय संबंध पूर्वी सलोख्याचे नव्हते. हे दोन्ही नेते एकाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अनेकदा त्यांचे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्याचा परिपाक भुसे आणि भुजबळ यांच्यातील ‘दोस्ताना’ वाढण्यात झाल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असे. सहाजिकच समितीच्या यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भुजबळ समर्थकांची भुसे गटास मदत झाली होती. मधल्या काळात मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडून आली आहे. त्याची परिणिती यावेळची निवडणूक हिरे व भुजबळ समर्थकांनी एकत्र लढण्यात झाली. हिरे गटाचा विजयाचा मार्ग सुकर होण्याचे ही दिलजमाईही एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

या पराभवामुळे जनमत प्रतिकूल होत असल्याचे प्रतित होत असल्याने ही बाब भुसे गटाची चिंता वाढवणारी आहे. तसेच आगामी राजकारणाच्या दृष्टीने भुसे यांना आत्मपरीक्षण करणे भाग आहे, असा संदेशही या निकालाद्वारे दिला गेल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defeat in market committee raises alarm bells for minister dada bhuse print politics news ssb