छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटातून उमदेवारी घेणाऱ्यांनी आता सत्ताधारी गटात प्रवेश करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात कोणत्याही निवडणुका नसताना घाऊक पक्षांतरे सुरू झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका चुकून लागल्याच तर अशी भीती त्यामागे असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पक्षांतरे घडवून आणण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे बंडखोरी करणाऱ्यांना भाजपने पुन्हा समावून घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षांतरे घडवून आणण्यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्ष आघाडीवर होता. ऐन निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष किशनचंद तनवाणी यांनी सोडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला लागली गळती थांबली नाही. पहिल्या टप्प्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पक्षांतर घडवून आणले. यामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडले यांचा समावेश होता. एवढे दिवस माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर सावलीसारखे फिरणारे घाेडेले आता संजय शिरसाट यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य मतदारसंघातील माजी नऊ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ही पक्षांतरे घडवून आणली. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागामध्ये वा वार्डात प्रभावी असणाऱ्या व्यक्तींना पक्षात स्थान दिले जात आहे. याशिवाय होणाऱ्या मोठ्या पक्षांतरासाठी ‘ ऑपरेशन टायगर ’ सुरूच ठेवण्यात येईल अशी घोषणा समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट दोन – तीन दिवसाआड एकदा आवर्जून करतात. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारुन उमेदवारी मिळविणारे आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जालना जिल्ह्यातील परतूरचे आसाराम बोराडे यांचे नाव घ्यावे लागेल. गंगाखेडमधून उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणारे जिल्हा प्रमुख विशाल कदम हेही शिंदे गटात गेले. या सर्व पक्ष प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात खास दौरे केले.

अजित पवार ‘ अग्रेसर ’

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बांधणीमध्ये अजित पवारही मराठवाड्यात निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. गंगापूर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. जालना जिल्ह्यातील माजी सनदी अधिकारी मधुकर अर्दड यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. कॉग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनीही अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. परभणीमधील वंचितच्या सुरेश नागरे यांनीही हाती घड्याळ बांधले. आता भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई यांनाही अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचे आहे. त्यांनी नुकतेच अजित पवार यांची भेट घेतली. प्रताप पाटील चिखलीकर निवडून आल्यानंतर मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, व्यंकट पाटीज गोजेगावकर, शिवराज पाटील होटाळकर, मोहन हंबर्डे यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. अशोक चव्हाण यांचे नेतृत्वात काम करणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर, हिंगालीचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी राष्ट्रवादी जवळ केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतीश चव्हाण वगळता अन्य कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

भाजपमध्ये घरवापसी

भाजपमध्ये मात्र घरवापसी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाकरे गटात गेलेले सिल्लोडचे सुरेश बनकर स्वगृही परतले. शिवसेनेच्या प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या विरोधात निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर डॉ. दिनेश परदेशी यांनीही पुन्हा भाजपला जवळ केले. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीही भाजपमध्ये आले. बंडखोरी करुन निवडणूक लढविणारे दिलीप कंदकुर्ते यांना प्रवेश देण्यात आला. लोह्याचे ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मराठवाड्यातील बहुतेक कार्यकर्त्यांना आता विरोधी पक्ष नको रे बाबा, अशी भूमिका वठविण्याचे ठरवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आणखी पक्षांतरे वाढतील, असे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे.