2025 Delhi Legislative Assembly election : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर येत्या दोन महिन्यांत राजधानी दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू असून ठिकठिकाणी प्रचाराचे बॅनर्स लावले जात आहेत. एकीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली असताना दुसरीकडे भाजपाने अद्याप एकाही उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी अमित शाह यांनी मास्टर प्लान आखला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली विधानसभेसाठी भाजपाची खास रणनीती

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी भाजपात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीकडे खास लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे देखील आपल्या हाती घेतली आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत नेतृत्व करावे, अमित शाह यांची इच्छा आहे. दिल्ली विधानसभेत एकूण ८० जागा असून गेल्या तीन दशकांपासून भाजपाला येथे सत्ता स्थापन करता आलेली नाही.

हेही वाचा : Ajit Pawar: अजित पवारांसाठी ‘अब दिल्ली दूर नहीं’; फेऱ्या वाढल्या, ‘अंतर’ घटलं!

अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताधारी आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील आपल्या २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षाच्या राज्य निवडणूक समितीची निवड आणि कोअर कमिटीच्या पुनर्रचनेत होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीच्या अंतिम छाननीपूर्वी या दोन्ही पॅनेलद्वारे संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाते.

भाजपाची ‘परिवर्तन यात्रा’ स्थगित

सत्ताधारी आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा नेते दिल्लीत ८ डिसेंबरपासून ‘परिवर्तन’ यात्रा काढणार होते. मात्र, ऐनवेळी ही यात्रा पुढे ढकलण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “सगळी तयारी झालेली असताना परिवर्तन यात्रा का सुरू झाली नाही, यामागचे कारण सांगणे कठीण आहे. कदाचित पक्षाच्या रणनितीत बदल केला जाण्याची शक्यता आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की भाजपा हायकमांड मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्याचा विचार करीत आहेत. तर काहींच्या मते संघटनात्मक पातळीवर बदल केले जाऊ शकतात.”

भाजपातील एका गटाने तर थेट लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडेच बोट दाखवलं आहे. “वरिष्ठ नेते अधिवेशनाच्या कामकाजात अडकल्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. समित्यांची निवड ही केवळ औपचारिकता असून आवश्यक असल्यास ती काही मिनिटांत केली जाऊ शकते”, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपा नेत्यांना नेमकी कोणती भीती?

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी असा सल्ला दिला आहे की, “राज्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पक्षाच्या इतर योजनांशी सुसंगत असू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार निवडणुकीचे व्यवस्थापन भाजपाच्या दिल्लीतील सात खासदारांच्या हातात दिले जाऊ शकते. त्यांच्यामार्फत निवडणुकीसाठी कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. परंतु, सध्या याबाबत फक्त शक्यताच वर्तवल्या जात आहेत.” दरम्यान, उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात उशीर झाला तर त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळेल, त्यामुळे निवडणुकीत पक्षाला नुकसान सहन करावे लागू शकते, अशी भीती भाजपाच्या काही नेत्यांना वाटत आहे.

हेही वाचा : IAS Ashwini Bhide : अश्विनी भिडे- मेट्रोवूमन आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव, जाणून घ्या त्यांचा प्रवास

तर, भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व सध्या व्यग्र असल्यामुळे उमेदवारांची नावे देण्यास काहीसा विलंब होत आहे. लवकरच यादी जाहीर केली जाईल आणि यामुळे काहीही नुकसान होणार नाही, असं एका नेत्यांने सांगितलं आहे. ते म्हणाले की, “लोकसभेचे अत्यंत महत्त्वाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय नेते व्यग्र आहेत. आम्ही जसा विचार करीत होतो, त्यापेक्षाही सर्व संघटनात्मक कामे खूपच सुरळीत सुरू आहेत. राज्य निवडणूक समिती आणि कोअर कमिटीची निवड काही मिनिटांत केली जाईल. उमेदवारांची चाचणी घेऊन तासाभरात यादी राष्ट्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाईल”, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभेआधी भाजपात फेरबदल होणार का?

राज्यातील नेतृत्वात फेरबदल होण्याच्या चर्चेवर देखील भाजपा नेत्याने भाष्य केलं. ते म्हणाले, पक्षात कोणतेही संघटनात्मक बदल केले जाणार नाहीत. युद्ध सुरू असताना सेनापती कोण बदलतो? या सर्व अफवा असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” दरम्यान, भाजपाने निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे लवकर जाहीर न केल्यास जानेवारीच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते, अशी भीती काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. “डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण, हा काळ अशुभ मानला जात आहे. याचाच अर्थ ही घोषणा १६ जानेवारीपर्यंतच होण्याची शक्यता आहे,” असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi assembly election 2025 aap vs bjp candidates list still awaited and yatra cancelled what is the reason sdp