Delhi Vidhan Sabha Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ५ फेब्रुवारीला राजधानीतील ७० जागांसाठी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पार्टीला शह देण्यासाठी भाजपाकडून नवनवीन रणनीती आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये महिलांसाठी रोख रक्कम, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसप्रवास अशा कल्याणकारी योजनांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठं यश मिळाल्याचं दिसून आलं होतं. मध्य प्रदेशातही ‘लाडली बहना’ योजनेमुळं भाजपाला मोठा विजय मिळवता आला. याच धर्तीवर भाजपा दिल्लीतील महिलांसाठी योजना आणण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आम आदमी पार्टीने महिलांना दरमहा रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती.
विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची मुभा मिळणार?
भाजपाच्या निवडणूक जाहीरनामा समितीत असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “मोफत बसप्रवास योजनेत विद्यार्थ्यांसाठी कोणतीही वयोमर्यादा असणार नाही. ४ वर्ष वयोगटापासून ते ४० वर्षांच्या पीएचडी स्कॉलर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मोफत बसप्रवास करता येईल. सध्या आम आदमी पार्टीने फक्त महिला तसेच विद्यार्थिनीसाठी बसप्रवास मोफत केला आहे. परंतु, या योजनेचा सर्वांनाच लाभ घेता यावा यासाठी आम्ही जाहीरनाम्यातून आश्वासन देणार आहोत. यामुळे दिल्लीतील मतदार आमच्याकडे आकर्षित होण्यास मदत होईल”, असंही भाजपा नेत्याने सांगितलं आहे.
भाजपा महिलांना देणार आर्थिक सहाय्य
मोफत बसप्रवास योजनेचा लाभ लाखो विद्यार्थी तसेच तरुणांना होईल. ज्येष्ठ नागरिकही योजनेसाठी पात्र असेल, असंही भाजपा नेत्याने स्पष्ट केलं. दरम्यान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर भाजपाकडून दिल्लीतही या योजनेची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, “महिलांना दरमहा मिळणारे आर्थिक सहाय्य २,५०० ते ३००० रुपयांच्या आसपास असेल. जाहीरनाम्यात योजना आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपा नेते मतदारांना योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतील.”
“त्याचबरोबर आम आदमी पार्टीने जाहीर केलेली महिला सन्मान योजना आणि भाजपाची योजना यामधील फरक मतदारांना समजावून सांगतील. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात योजनेची अंमबजावणी करण्यात त्यांना अपयश आलं, हा मुद्दाही मतदारांच्या लक्षात आणून देण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल”, असंही पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं.
भाजपाकडून दिल्लीतील मतदारांना अनेक आश्वासनं
भाजपाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की, “दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यी तसेच महिलांसाठी स्पेशल बससेवा सुरू करण्यात येईल. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची संख्याही वाढवली जाईल.” भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, “पक्षाचा जाहीरनाम्यात २०० युनिटपर्यंत मोफत वीज, घरोघरी पाण्याचे नळ, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबांना हक्काची घरं, यमुना नदीची स्वच्छता आणि दिल्लीतील कचऱ्यांचे ढीग नष्ट करणे, यासारख्या आश्वासनांचा समावेश असेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी दिल्लीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. “राजधानीतील जनतेने भाजपाच्या हातात सत्ता दिल्यास गरीबांना हक्काची घरं, २०० युनिटपर्यंत मोफत वीज, २० हजार लीटरपर्यंत दररोज मोफत पाणीपुरवठा आणि महिलांना १०० टक्के बसप्रवास यासारख्या कल्याणकारी योजना राबवल्या जाईल, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. त्याचबरोबर दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक सुरूच राहतील, असंही मोदी म्हणाले होते.
दिल्लीत कल्याणकारी योजनांचा महापूर
दरम्यान, भाजपाबरोबर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने देखील दिल्लीतील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केलं आहे. महिनाभरापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दरमहा १००० रुपयांची आर्थिक देण्याची घोषणा केली होती. राजधानीत पुन्हा आपचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा केले जाईल, असंही ते म्हणाले होते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा, मंदिराच्या पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथींना दरमहा १८ हजार रुपयांची आर्थिक मदत, दलित समुदायातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
हेही वाचा : Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात ‘प्यारी बहना योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच दिल्लीतील सर्व नागरिकांना ४०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि २५ लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा देण्याची हमी दिली आहे. दरम्यान, भाजपाने यापूर्वी ‘आप’ सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांवर टीका केली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अरविंद केजरीवाल ‘रेवडी’ वाटप करत आहेत, असं भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात अनेकदा या योजनांचा उल्लेख केला होता. आता भाजपाकडूनच मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने दिली जात आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत भाजपाची सत्ता येणार?
गेल्या २५ वर्षांपासून भाजपा दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. १९९३ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर दिल्लीची सत्ता राखण्यात पक्षाला अपयश आलं. काँग्रेसने १९९८ ते २०१३ पर्यंत सलग तीनवेळा दिल्लीवर राज्य केलं. २०१३ मध्ये मोदी लाटेत भाजपाला दिल्लीची सत्ता मिळवण्याची संधी होती. परंतु, आम आदमी पार्टीच्या उदयानंतर दिल्लीतील मतदारांनी भाजपा आणि काँग्रेसला नाकारलं. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दशकभरापासून दिल्लीची सत्ता राखली आहे. यंदा भाजपासाठी दिल्लीच्या सत्तेचे दरवाजे उघडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.