BJP vs AAP Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरते. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. राजधानीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ने काही जागांवर कमी मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही याच जागा सत्ताधाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीने आपने दिल्लीतील ७० पैकी तब्बल ६७ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. २०२० मध्ये ६२ जागा जिंकून केजरीवालांनी पुन्हा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली. दरम्यान, २०१५ च्या तुलनेत आपने २०२० मध्ये पाच जागा कमी जिंकल्या असल्या तरी पक्षाने ६१ मतदारसंघ राखले आणि एक नवीन जागा जिंकली. परंतु, या ६१ जागांपैकी ३२ जागांवर आपचा मतांचा टक्का घसरला, तर ४२ जागांवर पक्षाचे उमेदवार अतिशय कमी मताधिक्याने विजयी झाले. विशेष बाब म्हणजे, या सर्व जागांवर भाजपाला मिळालेल्या मताधिक्यात वाढ झाली.
दोन निवडणुकांमध्ये ‘आप’चे मताधिक्य घटलं
उत्तर पश्चिम दिल्ली जिल्ह्यातील आठ जागांवर ‘आप’च्या मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक घट झाली. दक्षिण आणि पश्चिम दिल्ली जिल्ह्यात प्रत्येकी सहा जागांवरही पक्षाचे मताधिक्य घटलं. एकूणच १४ जागांवर ‘आप’च्या मतांच्या टक्केवारी ५ टक्क्यांहून अधिक घटली. उत्तर पश्चिम दिल्लीच्या किरारी मतदारसंघात ११.८९ टक्के इतकी सर्वात मोठी घट झाली. २०१५ ते २०२० दरम्यान ज्या ३२ जागांवर ‘आप’च्या मतदानाचा टक्का घसरला, त्यापैकी २९ जागांवर भाजपा आणि पाच जागांवर काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ झाली. यापैकी १० जागांवर भाजपाच्या मताधिक्य १० टक्क्यांहून अधिक वाढले, यामध्ये वायव्य आणि दक्षिण दिल्ली जिल्ह्यातील प्रत्येकी तीन जागांचा समावेश आहे. तर २३ जागांवर भाजपाचे ५ टक्के मताधिक्य वाढले, त्यात वायव्य दिल्लीतील आठ जागा समाविष्ट आहेत.
आणखी वाचा : Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
कोणकोणत्या मतदारसंघात भाजपाचे मताधिक्य वाढलं?
भाजपाची पटपडगंज विधानसभा मतदारसंघ (१३.९५ टक्के), किरारी मतदारसंघ (१३.३५ टक्के), विकासपुरी (१२.५२ टक्के), तुघलकाबाद (१२.०७ टक्के) आणि आदर्श नगर मतदारसंघात (१२.०२ टक्के) सर्वाधिक मतांची वाढ झाली. याच कारणाने ‘आप’ने यंदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पटपडगंज मतदारसंघाऐवजी जंगपुरा येथून उमेदवारी दिली. एकूणच २०१५ ते २०२० पर्यंत भाजपाने दिल्लीतील ६२ जागांवरील पक्षाच्या मताधिक्यात वाढ केली. दुसरीकडे, या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सर्वच सात जागांवर दणदणीत विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या सर्व ६७ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली. यातील ५४ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी २०२० च्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक वाढली. दरम्यान, २०१५ च्या तुलनेत २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ४२ मतदारसंघात ‘आप’च्या विजयाचं अंतर घटलं. या जागांवरील पक्षाच्या सरासरी विजयाचं अंतर २८ हजार ७०० वरून २२ हजार इतकं झालं. यातील एक जागा वगळता सर्व जागांवर भाजपाने आपल्या मतांची टक्केवारी वाढवली.
कोणकोणत्या मतदारसंघात आपचं मताधिक्य घटलं?
दिल्लीत २४ विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे मताधिक्य १० हजारांहून अधिक मतांनी घसरलं. यामध्ये वायव्य दिल्ली जिल्ह्यातील सात मतदारसंघ, पश्चिम आणि दक्षिण दिल्ली जिल्ह्यात प्रत्येकी पाच मतदारसंघाचा समावेश होता; तर बिजवासन, आदर्श नगर, कस्तुरबा नगर, पटपडगंज, शालीमार बाग आणि छत्तरपूर या सहा मतदारसंघात आपचे मताधिक्य पाच हजारपेक्षा कमी झालं. सर्वात जास्त फरक किराडी विधानसभा मतदारसंघात दिसून आला. २०१५ मध्ये या मतदारसंघातून आपच्या उमेदवाराने तब्बल ४५ हजार मताधिक्याने विजय मिळवला होता. २०२० मध्ये या मतदारसंघातील विजयाचा फरक केवळ पाच हजार ६५० मतांचा होता. तथापि, काही मतदारसंघांमध्ये आपच्या मताधिक्यातही वाढ झाली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणती अपेक्षा?
काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनुसार, राजधानीच्या ७० पैकी २८ विधानसभा मतदारसंघात पक्षाला मताधिक्य वाढण्याची आशा आहे. यासाठी काँग्रेसने आपल्या निवडणूक मोहिमेत ‘सॉफ्ट हिंदुत्व’ तसेच दिल्ली न्याय यात्रा, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. नवी दिल्ली, कालकाजी, सीमापुरी, समयपूर बदली, पटपडगंज आणि कस्तुरबा नगर यांसारख्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नक्कीच विजयी होणार, असा विश्वासही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
२०१५ ते २०२० च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे कस्तुरबा नगर वगळता वरील सर्व मतदारसंघात मताधिक्य कमी झाले आहे. फक्त कस्तुरबा मतदारसंघात पक्षाचे मताधिक्य १० टक्यांनी वाढलं आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, मतिया महल, ओखला, जंगपुरा, बाबरपूर, मुस्तफाबाद, सीलमपूर, नांगलोई जाट, सुलतानपूर मांजरा आणि बवाना या मतदारसंघात पक्षाच्या मताधिक्यात मोठी वाढ होऊ शकते. २०१५ ते २०१९ पर्यंत या सर्व जागांवर काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली होती. मुस्तफाबाद (२८.८ टक्के) आणि मतिया महलमध्ये (२२.९ टक्के) पक्षाचे सर्वाधिक मताधिक्य घटले होते.
दिल्लीतील कोणकोणत्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचा प्रभाव?
नवी दिल्लीतील जंगपुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासमोरही काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे. दिल्लीतील बल्लीमारन, चांदणी चौक, सदर बाजार, त्रिलोकपुरी, कोंडली, बिजवासन, मंगोलपुरी, उत्तम नगर, वजीरपूर, आदर्श नगर आणि संगम विहार यांसारख्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे या जागांवर पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसला कोणकोणत्या मतदारसंघात विजयाचा विश्वास?
२०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत यापैकी आठ मतदारसंघात काँग्रेसचे मताधिक्य घटले होते. “काँग्रेसला ज्या मतदारसंघात विजयाचा विश्वास आहे, त्यापैकी बहुतेक मतदारसंघात ‘आप’ सरकारने कोणतेही विकासात्मक प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या विद्यमान आमदारांविरोधात मतदारांची नाराजी आहे. २८ जागांवर अत्यंत चुरशीची लढत होईल”, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. दुसरीकडे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही या जागांवर भाजपाचेच उमेदवार विजयी होतील.
हेही वाचा : Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?
भाजपाचे दिल्लीतील नेते काय म्हणाले?
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “बहुतेक जागा उत्तर पश्चिम दिल्ली संसदीय विभागाच्या अंतर्गत येतात, जिथे लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विजयाचे अंतर १९ टक्के मतांपेक्षा जास्त होते. पश्चिम आणि दक्षिण दिल्ली, तसेच चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातील ४० विधानसभा मतदारसंघांपैकी पाच जागा वगळता भाजपाचे मताधिक्य २०२० ते २०२४ दरम्यान १० टक्क्यांहून जास्त वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपाला मतदान केलं होतं. विधानसभा निवडणुकीतही ते भाजपालाच मतदान करतील”, असा विश्वासही भाजपा नेत्याने व्यक्त केला.
लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेतही होणार?
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या १० पैकी तीन विधानसभा मतदारसंघात तब्बल ६० टक्के मतं मिळवली होती, तर नऊ मतदारसंघात भाजपाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील १० पैकी आठ विधानसभा मतदारसंघांतही भाजपाला ५० टक्क्यांहून अधिक मताधिक्य मिळालं. चांदणी चौकमधील पाच विधानसभा मतदारसंघात भाजपाला मिळालेलं मताधिक्य ६० टक्के इतकं होतं, तर दक्षिण दिल्ली संसदीय मतदारसंघातील सहा विभागांमध्ये भाजपा उमेदवाराला तब्बल ६० टक्के मताधिक्य मिळालं होतं.
दिल्लीत पुन्हा अरविंद केजरीवालांची सत्ता येणार?
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं, “आम्हाला खात्री आहे की २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे ४५ हून अधिक उमेदवार विजयी होतील.” दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “माझ्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत ५५ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी होतील, परंतु महिला मतदारांनी साथ दिली आणि पुरुष मतदारांनीही उत्साहाने मतदान केलं, तर आम आदमी पार्टीला निवडणुकीत ६० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल”, असा विश्वास माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यंदा कोणता पक्ष दिल्लीचे तख्त राखणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.