AAP vs BJP vs Congress Vote Margin: दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवत पक्षाची २७ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणली. १९९८ पासून भाजपा दिल्लीत सत्तेपासून दूर राहिल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजयासाठी भाजपानं कंबर कसली होती. ही निवडणूक पक्षानं प्रतिष्ठेची केली होती. आम आदमी पक्षाला अँटि इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचं आता दिसून आलं आहे. मात्र, त्याचबरोबर आम आदमी पक्षाला काँग्रेसमुळेही मोठा फटका बसल्याचं आता निवडणुकीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागलं आहे. दिल्ली निवडणुकीत एकूण १३ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या मतदारानं घेतलेली मतं ही भाजपाच्या उमेदवाराच्या विजयी मताधिक्यापेक्षा जास्त आहेत. खुद्द आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनादेखील याचा फटका बसल्याचं दिसून येत आहे.
आपच्या दिग्गजांचा पराभव, भाजपाचा मोठा विजय, काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ
दिल्लीत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदार संघात पराभव झाला. दुसरीकडे मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा, सौरभ भारद्वाज यांचा ग्रेटर कैलाश, सोमनाथ भारती यांचा मालवीय नगर तर दुर्गेश पाठक यांचा राजेंद्र नगर मतदारसंघात पराभव झाला. या सर्व जागांवर काँग्रेसला भाजपाच्या विजयी मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.
यातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस व आम आदमी पक्ष या दोन पक्षांना मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी ही ४९.९१ टक्के इतकी आहे. भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४५.७६ टक्के आहे. त्यामुळे काँग्रेस व आपची आघाडी झाली असती, तर भाजपासाठी विजय कठीण होऊ शकला असता, असा तर्क आता राजकीय वर्तुळात लावला जाऊ लागला आहे.
खुद्द केजरीवाल यांना बसला फटका!
भाजपाचे परवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल गेल्या तीन निवडणुकांमध्ये जिंकून येत आहेत. पण यावेळी त्यांचा परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी पराभव केला. पण इथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना ४५६८ मतं मिळाली. २०१३ सालच्या निवडणुकीत याच मतदारसंघातून केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. परवेश वर्मा हेदेखील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.
दुसरा धक्का..जंगपुरा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला दुसरा मोठा धक्का मनीष सिसोदिया यांच्या रुपात बसला. भाजपाचे तरविंदर सिंग मरवा यांनी मनीष सिसोदिया यांचा अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना ७३५० मतं मिळाली. पटपडगंजमधून सिसोदिया तीन वेळा निवडून आले होते. यावेळी त्यांना जंगपुरामधून उमेदवारी देण्यात आली होती.
तिसरा धक्का…सौरभ भारद्वाज
ग्रेटर कैलाश मतदारसंघातून आपचे सौरभ भारद्वाज यांचा भाजपाच्या शिखा रॉय यांनी ३१८८ मतांनी पराभव केला. तिसऱ्या स्थानी राहिलेले काँग्रेस उमेदवर गार्वित सिंघवी यांना ६७११ मतं मिळाली. भारद्वाज हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार होते. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात भारद्वाज यांनी गृह, आरोग्य, ऊर्जा, नगरविकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
सोमनाथ भारती यांचा पराभव
आपच्या पराभूत उमेदवारांमधील आणखी एक दिग्गज नाव म्हणजे सोमनाथ भारती. भाजपाचे सतीश उपाध्याय यांनी भारती यांचा २१३१ मतांनी पराभव केला. इथे काँग्रेसचे जितेंद्र कुमार कोचर यांचा ६७७० मतांनी पराभव झाला. सर्वोच्च न्यायालय व दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करणारे सोमनाथ भारती हे २०१३ सालापासून मालवीय नगरमधून आमदार म्हणून निवडून येत होते.
विधानसभा उपाध्यक्षांचाही पराभव
दिल्ली विधानसभेतील उपाध्यक्षा राखी बिर्ला यांचाही निवडणुकीत पराभव झाला. मंगोलपुरीतून तीन वेळा निवडून येणाऱ्या राखी बिर्ला यांना यावेळी मादियापूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासमोर भाजपाचे कैलाश गंगवाल १०,८९९ मतांनी जिंकून आले. पण त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार जे. पी. पनवार यांना १७९५८ मतं मिळाली.
राजिंदर नगरमधून भाजपाचे उमंग बजाज यांनी १२३१ मतांनी विजय मिळवला. आपचे दुर्गेश पाठक यांचा पराभव झाला. पण इथे काँग्रेसचे विनीत यादव यांना ४०१५ मतं मिळाली. संगम विहार मतदारसंघात आपचे उमेदवार दिशेन मोहनिया यांचा अवघ्या ३४४ मतांनी पराभव झाला. भाजपाचे चंदन कुमार चौधरी या मतदारसंघातून विजयी झाले. काँग्रेसचे हर्ष चौधरी यांना इथे १५,८६३ मतं मिळाली. याव्यतिरिक्त बादली, छतरपूर, मेहरौली, नांगलोई जाट, तिमारपूर आणि त्रिलोकपुरी या मतदारसंघांमध्येही अशाच प्रकारचे निकाल लागले.
काँग्रेसला एकही विजय नाही
दरम्यान, काँग्रेसनं १३ ठिकाणी आपच्या विजयात अडचण निर्माण केली असली, तरी काँग्रेसला स्वत:ला मात्र यंदाच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. २०१५, २०२० आणि आता २०२५ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत एकही जागा जिंकण्यात अपयश आलं.