Satyendar Jain : आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री सत्येंद्र जैन हे तब्बल १८ महिन्यानंतर तुरुंगामधून बाहेर आले आहेत. सत्येंद्र जैन यांना मे २०२२ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. मात्र, आता सत्येंद्र जैन यांना दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर करत दिलासा दिला. पण जामीन मंजूर करताना काही महत्वाच्या अटीही घातल्या आहेत. सत्येंद्र जैन हे तब्बल १८ महिने तुरुंगात राहिल्यानंतर आता तुरुंगामधून बाहेर आल्यामुळे सत्येंद्र जैन यांच्यासह आम आदमी पक्षासाठी देखील हा मोठा दिलासा मानला जात आहे.
याचं कारण म्हणजे पुढच्या चार महिन्यांत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या कामात आम आदमी पक्ष देखील मागे नाही. अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी मोठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, सत्येंद्र जैन हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगामधून बाहेर आले आहेत, त्यामुळे त्यांचा जामीन हा पक्षासाठी बळ देणारा ठरेल का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा : महिला नेत्या सरसावल्या! काँग्रेससाठी एक तरी महिला उमेदवार लाडकी बहीण ठरणार का?
आम आदमी पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यासह सत्येंद्र जैन या नेत्यांना अटक झाली होती. मात्र, या नेत्यांना जामीन मिळाल्यानंतर हे सर्व नेते तुरुंगातून बाहेर आले आहेत. तसेच दिल्लीच्या विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्व नेते कामाला लागले आहेत. सत्येंद्र जैन हे देखील तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेच शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघात कामाला लागल्याचं दिसत आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर २०१७ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. सत्येंद्र जैन यांना अटक होण्यापूर्वी त्यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहरी विकास विभाग हे खाते होते. दरम्यान, आता पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी जैन यांची सुटका ही आम आदमी पक्षासाठी बूस्टर डोस मानला जात आहे.
दिल्लीत सरकारी रूग्णालयांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात होता हे पाहून सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. जेणेकरून लोकांसाठी काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांनी आणि जैन यांनी दिल्ली मंत्रिमंडळातील पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यात त्यांचे विविध खाते विभागले गेले होते. आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. हे पाहता जैन यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे, त्यांची तब्येत आणि जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहिल्यामुळे पक्षाने त्यांना विचार करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती आखण्यासाठी थोडा वेळ देण्याची शक्यता असल्याची माहिती ‘आप’मधील एका नेत्याने दिली.
आम आदमी पक्षाच्या एका सूत्राने सांगितले की, “आमदार म्हणून त्यांचा (जैन) ट्रॅक रेकॉर्ड दिल्ली विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्याच्या त्यांच्या शक्यतांबाबत मुद्दा बनू शकतो. त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक रुपयाही खर्च केलेला नाही. त्यामुळे कदाचित ते त्यांच्या मतदारसंघामधून यावेळी निवडणूक लढवणार की नाही? याबाबत सांशकता आहे”, असं आम आदमी पक्षाच्या एका सूत्राने म्हटलं आहे.