Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासह काँग्रेस आणि भाजपा अशी प्रामुख्याने तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. या निवडणुकीत इतर काही पक्षही निवडणूक लढवू शकतात. मात्र, खरी लढत आम आदमी पक्षासह काँग्रेस आणि भाजपा अशीच असेल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेत, तर दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या काही उमेदवारांची नावं जाहीर केले आहे. सध्या दिल्लीत सर्वच पक्षांकडून सभा, मेळावे, रॅलीसह मतदारसंघात आढावा घेतला जात आहे. तसेच विविध मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांचे दौरे वाढले आहेत. त्यामुळे आतापासून दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून चांगलंच राजकारण तापलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षानेही दिल्लीच्या निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरु केली आहे. सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार आहेत. मात्र, दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाने जवळपास सर्वच उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही काही उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या अलका लांबा नेमकी कोण आहेत? त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

हेही वाचा : Who is Sanjay Prasad : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्वात विश्वासू IAS अधिकारी संजय प्रसाद कोण आहेत?

काँग्रेसने अलका लांबा यांना विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं की, काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत लांबा यांची उमेदवारी १२ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार होती. मात्र, त्यांना कालकाजीमधून निवडणूक लढवण्याबद्दल आत्मविश्वास नसल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला. लांबा १९९० च्या दरम्यान दिल्ली विद्यापीठातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) मध्ये सामील झाल्या. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या अलका लांबा या माजी अध्यक्षा आहेत. त्यानंतर २००२ मध्ये सरचिटणीस ते २०२४ मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. अलका लांबा यांच्या धाडसीपणा आणि उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्यामुळे हे शक्य झाल्याचं सांगितलं जातं. अलका लांबा यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीमध्येही विविध भूमिका बजावलेल्या आहेत.

दरम्यान, २००३ मध्ये भाजपा नेते माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांच्याविरोधात अलका लांबा यांनी निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेससोडून अलका लांबा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. आपमध्ये त्यांनी प्रवक्ता आणि प्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर ‘आप’ने २०१५ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्या चांदनी चौक मतदारसंघातून आपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. मात्र, २०१९ मध्ये अलका लांबा यांनी आपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आम आदमी पक्ष आणि भारतीय जतना पक्षावर अलका लांबा या जोरदार टीका करताना अनेकदा पाहायला मिळाल्या. अलका लांबा यांनी गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर धर्माच्या राजकारणाचा आरोप केला होता. तसेच अलका लांबा यांनी एक पोस्ट शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. अलका लांबा यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत सत्तेत आले. मात्र, सत्तेवर येताच त्यांना त्याच भ्रष्टाचारामुळे आपली खुर्ची गमवावी लागली. एकेकाळी ते (आप) व्होट बँकेच्या राजकारणाचे कट्टर विरोधक होते. ते व्यवस्था बदलायला आले होते. आज त्यांच्यात मनपरिवर्तन झाले आहे. धर्माच्या राजकारणात ते भाजपापेक्षा दोन पावले पुढे आहेत”, असं त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi assembly elections 2025 who is alka lamba who was nominated by congress against delhi chief minister atishi gkt