दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तासांचा अवधी राहिला असून दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री आतिशी व अरविंद केजरीवाल तसेच, मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांसमोर पराभवाची टांगती तलवार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तिघांविरोधात काँग्रेसने तगडे उमेदवार दिल्यामुळे त्यांच्या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढाई होत असून ‘आप’च्या या नेत्यांना निवडणूक सहजसोपी राहिलेली नाही असे मानले जात आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये मध्यमवर्गीय सरकारी बाबू तसेच, झोपडपट्टीवासी असे दोन्ही स्वरुपांचे मतदार आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करून ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे भाजपला वाटत आहे. हा मध्यमवर्ग भाजपकडे तर, काँग्रेसच्या आक्रमक प्रचारामुळे झोपडपट्टीवासी मतदारही विभाजित होण्याचा धोका असून  त्याचा ‘आप’च्या तिघा उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते.

केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून चौथ्यांदा लढत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित व भाजपचे प्रवेश वर्मा रिंगणात उतरले आहेत. २०२० मध्ये केजरीवाल २१ हजार मताधिक्यांनी जिंकले होते. पण, या वेळी दीक्षित व वर्मा यांनी मतदारसंघात केजरीवालांविरोधात जोरदार प्रचार केला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप यांना आईच्या पराभवाचा बदला घ्यायचा असल्यामुळे ते गेले दोन महिने मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत. या मतदारसंघात सुमारे १ लाख १० हजार मतदार असून भाजप व काँग्रेसमध्ये मध्यमवर्ग व मुस्लिम-दलित मतदार विभागले गेले तर केजरीवालांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार तर, भाजपच्या उमेदवाराला २५ हजार मते मिळाली. केजरीवालांना ४६ हजार मते मिळाली. पण, यावेळी दीक्षित यांनी १० ते १५ हजार मतांपर्यंत मजल मारली आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांनाही तुलनेत अधिक मते मिळवली तर केजरीवालांपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळेच काही दिवसांपासून काँग्रेस व भाजप केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचा प्रचार करत आहेत.

केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे नाव घोषित केलेले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया संभाव्य उपमुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले होते. यावेळी सिसोदिया यांनी पराभवाच्या भीतीने  पटपडगंज हा आधीचा मतदारसंघ सोडून दिला असून ते जंगपुरामधून निवडणूक लढवत आहेत. इथेही काँग्रेस व भाजपचे उमेदवार तगडे असून त्रिकोणी लढतीमुळे सिसोदियांना विजय मिळवणे तुलनेत अवघड असल्याचे सांगितले जाते. सिसोदिया यांनी जंगपुरा मतदारसंघातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. दिल्लीमध्ये आप पुन्हा जिंकेल पण, जंगपुरामध्ये मात्र आपचा उमेदवार पराभूत होईल असे होऊ नये याची दक्षता घ्या, असे आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामुळे काँग्रसने सिसोदिया यांनीच पराभव मान्य केल्याचा प्रचार सुरू केला. जंगपुरामध्ये प्रियंका गांधी-वाड्रा यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.

कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी दुसऱ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून तिथेही भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी तर, काँग्रेसने अलका लांबा यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघामध्ये ५० टक्के मतदार झोपडपट्टीवासी आहेत. गुर्जर, पंजाबी हिंदू व शीख, जाट मतदार प्रभावी आहेत. गेल्यावेळी आतिशी विजयी झाल्या होत्या, त्यांना ५२ टक्के मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला ४२ टक्के व काँग्रेसच्या उमेदवाराला ५ टक्के मते मिळाली होती. यावेळी भाजप व काँग्रेसचे उमेदवार तुलनेत अधिक मजबूत असल्याने इथेही मध्यमवर्ग व झोपडपट्टीवासी मतदारांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर आतिशींच्या मतांचा टक्क्यामध्ये मोठी घसरण होऊ शकते. दोन्ही विरोधकांच्या मतांमध्ये प्रत्येकी दोन-तीन टक्के जरी वाढले तरी आतिशींसमोर पराभवाचा धोका असू शकतो असे मानले जात आहे.