BJP’s Delhi CM Face: दिल्ली विधानसभेच्या प्रचारात मोठी रंगत आली असून आम आदमी पक्ष आणि भाजपात सत्ता मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा दिसत आहे. दोन्ही पक्ष प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार रमेश बिधुरी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर ते आता विधानसभेसाठी मैदानात उतरले आहेत. मात्र त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे ते सतत वादात अडकत असतात. आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रमेश बिधुरी हेच भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे म्हटले आहे. भाजपा येत्या दोन-तीन दिवसांत याची अधिकृत घोषणा करेल, असेही ते म्हणाले. मात्र केजरीवालांच्या या खेळीवर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद केजरीवाल यांनी रमेश बिधुरी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी ठरवले जाईल, असे सांगतानाच त्यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. “रमेश बिधुरींनी सार्वजनिक मंचावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावे. दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्याकडे काय नियोजन आहे, हे सांगावे. भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये अशी खुली चर्चा व्हायला हवी. रमेश बिधुरी यांनी खासदार असताना मागच्या १० वर्षांत दिल्लीसाठी काय केले, हे ही सांगावे. तसेच विरोधकांनीही दिल्लीकरांसाठी काय करणार, याबद्दलची माहिती दिली पाहीजे.”

हे वाचा >> Arvind Kejriwal House: अरविंद केजरीवाल यांच्या घराची गोष्ट; १९४२ चं बांधकाम आणि ३३.६६ कोटींचा दुरुस्ती खर्च!

भाजपाचा निर्णय जाहीर करणारे केजरीवाल कोण? – शाह

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवालांच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? हे ठरविण्याचा केजरीवाल यांना अधिकार नाही. आमचा मुख्यमंत्री कोण असेल? हे केजरीवाल कसे काय ठरवू शकतात. ही त्यांची केवळ रणनीती आहे. पण दिल्लीकर त्यांचे आता काहीच चालू देणार नाहीत”, अशी टीका अमित शाह यांनी आज “झुग्गी बस्ती प्रधान संमेलन” या कार्यक्रमात बोलताना दिली.

हे ही वाचा >> Delhi Elections 2025 : अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लान आखला?

‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण?

अरविंद केजरीवाल यांनी भाजपाचा उमेदवार जाहीर केलेला असतानाच ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? असणार याचेही उत्तर दिले. आम आदमी पक्षाने सर्वसहमतीने निर्णय घेऊन माझ्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार केला आहे.

भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी कॅगच्या अहवालावरून दिल्ली सरकारवर टीका केली होती. तसेच आम आदमी पक्षात एक तरी स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे का? असे आव्हान दिले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रमेश बिधुरीच्या नावाबाबतची घोषणा केली. अनुराग ठाकूर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी अद्याप स्वतःलाच मुख्यमंत्री म्हणून मानलेले नाही. कॅगचा अहवाला दिल्ली सरकार पटलावर का मांडत नाही? याचेही उत्तर दिले पाहीजे.

‘आप’च्या हल्ल्यानंतर भाजपाचे नेते पुढे येऊन त्यांचा दावा खोडू पाहत आहेत. भाजपाचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? याची चिंता अरविंद केजरीवाल यांना का वाटत आहे. भाजपा का केडरबेस पक्ष असून योग्य वेळेला आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित करेल. मात्र भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे केजरीवाल यांनीही मान्य केल्याचे दिसत आहे.

मनोज तिवारी पुढे म्हणाले, दिल्लीकरांची दिशाभूल करण्यासाठी अरविंद केजरीवाल ही खेळी करत आहेत. पण दिल्लीमधील मतदार भाजपालाच निवडून देतील आणि भाजपा आपला मुख्यमंत्री निवडेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi assembly polls arvind kejriwal claims bjp cm face will be ramesh bidhuri amit shah reacts kvg