राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे या सर्वच राज्यांत जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न देशातील तसेच तेथील स्थानिक पक्षांकडून केला जात आहे. भाजपादेखील या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहात असून त्यासाठी नुकतेच केंद्रीय नेतृत्वाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक

मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत ज्या जागांवर अटीतटीची लढत होऊ शकते, त्या जागांकडे भाजपा विशेष लक्ष देणार आहे. त्यासाठी खास रणनीती आखली जाणार आहे. दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीला नरेंद्र मोदी, अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. भाजपा केंद्रीय निवडणूक समिती, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे प्रभारी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

जेथे अटीतटीची लढत, तेथे विशेष लक्ष

भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी भाजपाचे प्रभुत्व कमी आहे, त्या ठिकाणी पक्षाचे विशेष लक्ष असणार आहे. कोणत्या जागांवर विजय होईल किंवा कोणत्या जागेवर अटीतटीची लढाई होऊ शकते, अशा मतदारसंघांचा शोध घेतला जाणार आहे. छत्तीसगडमधील एक तृतीयांश जागांकडे भाजपाचे विशेष लक्ष आहे. जिंकण्यासाठी अवघड समजल्या जाणाऱ्या जागांवर विजयासाठी विशेष पॅनेलचीही स्थापना केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुका भाजपासाठी खूप महत्त्वाच्या

आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. असे असतानाच दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. भाजपा या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट होते. राजस्थान, तेलंगणा, मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही करू शकते. या राज्यांत ज्या पक्षाने चांगली कामगिरी केली, तोच पक्ष लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी करेल असे ढोबळमाणाने म्हटले जात आहे. त्यामुळे या सर्वच राज्यांची निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

अगोदरच्या विधानसभा निवडणुकीत काय स्थिती?

याआधीच्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाचा पराभव झालेला आहे, त्याच मतदारसंघांवर भाजपाचे विशेष लक्ष असणार आहे. २०१८ साली भाजपाचा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत पराभव झाला होता. मात्र मध्य प्रदेशमध्ये भाजपाने काँग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. याआधीच्या निवडणुकीत छत्तीसगड राज्यात भाजपाने ९० पैकी १५ जागांवर तर काँग्रेसने एकूण ६८ जागांवर विजय मिळवला होता. मध्य प्रदेशमध्ये एकूण २३० जागांपैकी भाजपाने १०९ तर काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाची चांगली कामगिरी

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाने या दोन्ही राज्यांत चांगली कामगिरी केली होती. भाजपाने छत्तीसगडमध्ये ११ जागांवर तर मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी एकूण २८ जागांवर विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi bjp top leaders meeting for madhya pradesh and chhattisgarh assembly election prd