केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार यांच्यादरम्यान प्रशासकीय अधिकार ताब्यात घेण्यावरून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलासा दिल्यानंतरही केंद्र सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय बदलला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आज मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, उभय नेत्यांमधील बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस वगळून इतर पक्षांची आघाडी करण्याबाबत चर्चा होईल. २०२४ च्या निवडणुकांसाठी काँग्रेसला अटी व शर्ती मान्य करायला लावून सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचा नवा फॉर्म्युला आजच्या बैठकीतून आखला जाईल, अशीही माहिती तृणमूलमधील सूत्रांनी दिली.
दिल्ली प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या करण्याचा अधिकार राज्य सरकारच्या हातातून काढून घेण्याचे काम केंद्र सरकारच्या अध्यादेशाने केले आहे. या अध्यादेशाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत. काल दिल्लीत अनेक राजकीय पक्षांना भेटल्यानंतर आज केजरीवाल कोलकाता येथे जात आहेत.
हे वाचा >> दिल्लीवर कुणाचे नियंत्रण? केंद्र सरकारचा अध्यादेश; सर्वोच्च न्यायालयाला आव्हान?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचा विडा उचलला आहे. रविवारी दोघांनीही दिल्ली येथे केजरीवाल यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि बॅनर्जी यांची भेट महत्त्वाची मानली जाते. याच महिन्यात काँग्रेसने कर्नाटकमध्ये भाजपाला पराभूत केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेत बदल करत काँग्रेस ज्या ठिकाणी बळकट आहे, त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या म्हणाल्या, “लोकसभेच्या २०० किंवा त्याहून थोड्या अधिक जागांवर काँग्रेस बळकट आहे, त्या ठिकाणी त्यांनी लढावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. पण त्यांनीदेखील इतर प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यायला हवा. तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टी हव्या असतील तर काही प्रमाणात तडजोडही करावी लागेल.”
तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, काँग्रेसने देशभरात भाजपाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने आघाडीतला सहकारी म्हणून भूमिका बजावावी, असे ममता बॅनर्जी आधीच म्हणाल्या आहेत. पण काँग्रेसला आमच्याविरोधात लढायचे आहे. हे व्हायला नको. मंगळवारी अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात होत असलेल्या बैठकीतून विरोधकांच्या आघाडीचा एक नवा फॉर्म्युला समोर येईल आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससमोर काही अटी ठेवल्या जातील, अशी शक्यता आहे.
कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांची भेट झाल्यानंतर केजरीवाल थेट मुंबईत येणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात दिल्ली सरकारला पाठिंबा देण्याची विनंती करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. भाजपाच्या विरोधात सर्व पक्षांनी आपापले अहंकार बाजूला ठेवून खुल्या मनाने एकत्र येण्याची गरज असल्याचे बॅनर्जी आणि कुमार या दोघांनीही बैठकीनंतर सांगितले होते.
हे वाचा >> “मी बोलतोय ते लिहून ठेवा, नितीश कुमारांची अवस्था…”, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
कुमार आणि यादव यांच्याआधी अखिलेश यादव यांनी कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यांनीही भाजपाच्या विरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी व्हावी, असा विचार मांडला होता.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या सीपीआय (एम) पक्षाने मात्र केजरीवाल आणि बॅनर्जी यांच्या बैठकीला फारसे महत्त्व दिलेले नाही. सीपीआय(एम)चे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, “एक मुख्यमंत्री दुसऱ्या मुख्यमंत्र्याला भेटत आहे. ही एक सामान्य बाब आहे. ममता बॅनर्जी यांची राजकीय विश्वासाहर्ता नसल्यामुळे आम्ही या बैठकीला फारसे महत्त्व देत नाही.”
तर भाजपाचे नेते सामिक भट्टाचार्य म्हणाले, “आम्ही विरोधकांच्या आघाडीचा विचारच करत नाही. प्रत्येक निवडणुकीच्या आधी राजकीय पक्ष आघाडी करण्यासाठी वाटाघाटी करत असतात. पण भारतीय नागरिकांनी आधीच स्थिर सरकारला मत द्यायचे, हा विचार केलेला आहे. भारतीय मतदार कोणत्याही प्रयोगाला मतदान करणार नाहीत.”