Delhi CM दिल्ली विधानसभेची निवडणूक भाजपाने ४८ जागा मिळवत एकहाती जिंकली आहे. येत्या आठवड्यात म्हणजेच आजपासूनच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल? याच्या घडामोडी अपेक्षित आहेत. कारण भाजपाला दिल्लीत २७ वर्षांनी सत्ता मिळाली आहे. भाजपाचे यासाठीचे निकष काय असतील आपण समजून घेऊ.
नवे अध्यक्ष निवडले जातील
राष्ट्रीय पातळीवर भाजपात एक मोठा बदल होणार आहे तो म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड. जे.पी. नड्डा यांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील. त्यानंतर नवी कार्यकारिणीही निर्माण होईल. दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री कोण याचा निर्णय लवकरच
दिल्लीचे मुख्यमंत्री, दिल्ली विधानसभेचे सभापती, दिल्लीचे उपमुख्मयंत्री या सगळ्या पदांवर कोण कोण बसणार? याची निवड लवकरच केली जाईल. भाजपाची सात सदस्यीय समिती याबाब निर्णय घेईल अशी चिन्हं आहेत.
जातीचं समीकरण काम करणार?
दिल्लीत मुख्यमंत्री निवडताना भाजपा जातीय समीकरण लक्षात घेईल यात शंका नाही. राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपाने मुख्यमंत्री म्हणून ब्राह्मण चेहरा दिला आहे. तर ओबीसी चेहरा हरियाणात आणि क्षत्रिय चेहरा उत्तर प्रदेशात दिला आहे. आता दिल्लीचा मुख्यमंत्री निवडताना हा निकष नक्की लक्षात घेतला जाईल. भाजपाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली की दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर एखाद्या जाट नेत्याचं नावही निवडलं जाईल. तसंच स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि संघाची निवड असलेल्या माणसाकडे झुकता कल असेल अशीही माहिती या नेत्याने दिली.
प्रवेश वर्मा यांचं नाव निश्चित?
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी प्रवेश वर्मा यांचं नाव निश्चित आहे असं बोललं जातं आहे. कारण नवी दिल्लीतून प्रवेश वर्मांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. सोशल मीडियावरही या गोष्टीची चर्चा रंगली. तसंच या रेसमध्ये आमदार विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी यांचीही नावं चर्चेत आहेत.
उपमुख्यमंत्री कोण?
दिल्लीत उपमुख्यमंत्री हे पदही निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास त्या जागेवर कुणाची निवड केली जाईल हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. दलित, महिला, शिख, वाणी समाज असं जातीय समीकरण ठरवूनच हे पद कुणाला द्यायचं ते ठरवलं जाईल अशीही एक चर्चा आहे. कदाचित दोन उपमुख्यमंत्रीही असू शकतात. मुख्यमंत्री कोण होणार? हे नाव जाहीर होत नाही तोपर्यंत या चर्चा सुरु राहणार आहेत. भाजपा धक्कातंत्राचा वापर करत महिला मुख्यमंत्रीही जाहीर करु शकतात असाही एक सूर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद लाभलेला माणूसच होणार मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा आशीर्वाद असलेला आणि पाठिंबा लाभलेला माणूसच मुख्यमंत्री होईल यात शंका नाही. आता यावेळी हे दोन दिग्गज नेते कुणाचं नाव जाहीर करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भाजपाच्या ‘या’ महिला उमेदवार दिल्ली विधानसभेत
भाजपातून यावेळी शालीमार बागमधून रेखा गुप्ता, ग्रेटर कैलाशमधून शिखर राय, वजीरपूरमधून पूनम शर्मा, नजफगडहून नीलम पहलवान या महिला आमदार झाल्या आहेत. रेखा गुप्ता आणि नीलम पहलवान यांनी २९ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजय मिळवला आहे. तर शिखा राय यांचा विजयही महत्त्वाचा मानला जातो आहे कारण त्यांनी ग्रेटर कैलाश या जागेवर आम आदमी पार्टीच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी सौरभ भारद्वाज यांचा पराभव केला आहे.