Delhi Vidhan Sabha Election 2025 : सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जात आहेत. भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही महिला मतदारांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, भाजपाने प्रचाराबरोबर फेसबुकवरील जाहिरातीचा खर्चही वाढवला आहे. त्यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला जाहिरातीच्या खर्चात कित्येक पटीने मागे टाकलं आहे.
न्यूज १८ च्या एका रिपोर्टनुसार, भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत गेल्या सात दिवसांत फेसबुकवरील जाहिरातींवर तब्बल ८३ लाख ३१ हजार ६३१ रुपये खर्च केले आहेत, तर आम आदमी पार्टीने फेसबुकवरील जाहिरातींसाठी पाच लाख ७५ हजार ३९९ रुपये खर्च केले आहेत. याबाबतीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी फेसबुकवरील जाहिरातींसाठी केलेला खर्च चार लाख ४५ हजार ४७५ रुपये इतका आहे. एकंदरीत तिन्ही पक्षांनी मिळून फेसबुकवरील जाहिरातींवर तब्बल १३ लाख २६ हजार १०१ रुपये उधळले आहेत.
आणखी वाचा : उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा? काय आहेत तरतुदी?
अलीकडेच फेसबुकच्या स्थान-आधारित जाहिरातींमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांत दिल्लीमधून फेसबुकला सर्वाधिक जाहिराती मिळाल्या आहेत असं न्यूज १८ ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत दिल्लीत डिजिटल माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर एकूण एक कोटी २७ लाख एक हजार ८६१ रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. फेसबुकवरील जाहिरात खर्चात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात फेसबुकवरील जाहिरातींसाठी तब्बल १८ लाख ५१ हजार २३७ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करण्यासाठी फेसबुकवर एआय-जनरेटेड मीम्स शेअर करत आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीकडून फेसबुकवर अनेक जाहिराती दिल्या जात आहेत. दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे गाणे ‘बहाना नही बदलाव चाहिये, दिल्ली में भाजपा सरकार चाहिये’ असे आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून शेअर केलं आहे, ज्यामुळे ऑनलाइन प्रचारमोहिमेला आणखी फोडणी मिळाली आहे. भाजपाने गेल्या सात दिवसांत निवडणूक प्रचारासाठी आपल्या अधिकृत अकाउंटवरून तब्बल १९७ पोस्ट शेअर केल्या आहेत.
भाजपाने दिल्लीतील मतदारांना काय आश्वासनं दिली?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रामुख्याने महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात ‘महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा २,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला २१ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि सहा पोषण किट देण्याची घोषणा केली आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या संकल्प पत्राचे अनावरण केले आहे. भाजपाच्या हातात दिल्लीची सत्ता दिल्यास सर्व विद्यमान कल्याणकारी योजना सुरू राहतील आणि भ्रष्टाचाराचा नायनाट केला जाईल, असं नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि होळी तसेच दिवाळीला एक मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर ६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्ती वेतन २००० रुपयांवरून २५०० पर्यंत नेले जाईल, असंही सांगितलं आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख सातत्याने का येतो?
आपने दिल्लीतील मतदारांना कोणती आश्वासनं दिली?
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत दरमहा २५०० रुपयांच्या आर्थिक मदतीचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांवर संजीवनी योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयांत मोफत उपचार केले जातील, असंही आपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच घोषणा केली की, राजधानीत पुन्हा आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेत आल्यास निवासी कल्याण संघटनांना (RWA) खाजगी सुरक्षा रक्षकांना कामावर ठेवण्यासाठी पैसे दिले जातील. तसेच मुलींच्या लग्नासाठी सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच सर्व नागरिकांना १० लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल.
काँग्रेसने दिल्लीतील मतदारांना कोणती आश्वासनं दिली?
भाजपा आणि आम आदमी पार्टी पाठोपाठ काँग्रेसनेदेखील दिल्लीतील मतदारांना आपल्या जाहीरनाम्यात मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. यामध्ये बेरोजगार तरुणांना दरमहा आठ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत, गरिबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, महिलांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत, मोफत रेशन किट आणि सर्वांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज अशा योजनांचा समावेश आहे. याशिवाय बेरोजगार तरुणांना एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. यासाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. गेल्या दशकभरापासून राजधानीत आम आदमी पार्टीची सत्ता आहे. भाजपाला २५ वर्षांपासून दिल्लीचे तख्त राखण्यात अपयश येत आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही ‘आप’ला सत्तेत येण्यापासून रोखण्याचे लक्ष्य ठेवलं आहे, त्यामुळे निवडणुकीत कोणत्या पक्षाला चांगलं यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.