Delhi Election 2025 Arvind Kejriwal AAP vs BJP : दिल्लीतील सर्वाधिक गर्दी असलेल्या बाजारपेठांपैकी एक म्हणजेच लाजपत नगर बाजारपेठ. हा संपूर्ण परिसर कापड व कपड्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वेगवेगळ्या शोभेच्या व कलात्मक वस्तूंचीदेखील विक्री होते. मात्र, येथील दुकानदारांना त्यांच्या दुकानांमधील गर्दी कमी होण्याची भीती आहे. ३७ वर्षीय माणिक अरोरा यांचं लाजपतनगरमध्ये शोभेच्या वस्तूंचे दुकान आहे. ते म्हणाले, “पार्किंग माफियामुळे आमचे नुकसान होत आहे. दिल्ली महानगरपालिकेने लाजपतनगरमधील पार्किंगचे व्यवस्थापन करण्यासाठी खासगी कंत्राटदारांना कंत्राट दिलं आहे. वाहन या भागात उभे करण्यासाठी कंत्राटदार वाहनधारकांकडून प्रति तास १०० रुपये आकारतात. इतके जास्त दर पाहता ग्राहक आमच्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी कसे येतील?”

६७ वर्षीय चित्रकार अनिल सूद म्हणाले, “दुकानांसमोरील रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आम्हाला त्यांचा त्रास सहन करावा लागतोय. मी गेल्या ३५ वर्षांपासून लाजपतनगरमध्ये पेटिंग्स विकतोय. मात्र, या भागात अनेक फेरीवाले बनावट पेटिंग्स विकतात. त्यांची किंमत खूप कमी असते. आम्हाला त्यांचा मोठा फटका बसतोय. आमच्याकडे ज्या वस्तू असतात अगदी तशाच वस्तू ते देखील विकत असतात. त्यांच्यामुळे ग्राहक आमच्यापासून तुटत चालला आहे, त्यामुळे आम्हाला वाटते की या भागातील विक्रेत्यांची संख्या मर्यादित व्हायला हवी, त्यांच्यासाठी विशिष्ट क्षेत्रे नेमून द्यावी. फेरीवाल्यांना येथे विक्री करण्यापासून मज्जाव करावा.

फेरीवाल्यांमुळे दुकानदार त्रस्त

“फेरीवाले, पार्किंग, खराब रस्त्यांमुळे आम्ही त्रस्त आहोत”, असे अरोरा यांनी सांगितले. “आम आदमी पार्टीने या मुद्द्यांकडे फारसे लक्ष दिलेले नाही”, असेही ते म्हणाले.

यंदा तिरंगी लढत

लाजपतनगर हा परिसर जंगपुरा विधानसभा मतदारसंघात येतो. ‘आप’ने या मतदारसंघातून यावेळी मनीष सिसोदिया यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने माजी आमदार तारविंदर सिंह मरवाह यांना येथून निवडणुकीसाठी उभे केले आहे. ‘आप’ने मागील तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात विजय मिळवला आहे, तर आधीच्या तीन निवडणुका तारविंदर सिंह मरवाह यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. तारविंदर सिंह मरवाह हे भाजपात गेले असले तरी या मतदारसंघात अजूनही काँग्रेसचा मतदारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होईल. काँग्रेसने फरहाद सुरी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

‘बनियां’चा केजरीवालांना पाठिंबा मिळणार का?

लाजपतनगरमधील व्यापाऱ्यांकडे भाजपाची पारंपरिक मतपेढी म्हणून पाहिले जाते. मोफत वीज व पाणी देऊन ‘आप’ने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. ‘आप’ने अलीकडेच व्यापारी शाखादेखील स्थापन केली आहे. लाजपतनगरमधून मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ‘आप’ला मताधिक्य मिळालं होतं. दरम्यान, सोमवारी अरविंद केजरीवाल यांनी येथील प्रचारफेरीत अधोरेखित केलं की ते स्वतः ‘बनिया’ आहेत (व्यापाऱ्यांचा समुदाय) आणि व्यापाऱ्यांकडे त्यांचं कधीच दुर्लक्ष होणार नाही. त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. ‘आप’ सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल. त्यानंतर भाजपाने येथील व्यापाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत.

फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याची तक्रार

लाजपतनगरपासून २० किलोमीटर अंतरावर राजौरी गार्डमधील शॉपिंग हबमधील धर्म नारायण गौतम यांनीदेखील फेरीवाल्यांची समस्या अधोरेखित केली. येथील मुख्य रस्त्यावर मोठी हॉटेलं, रेस्तराँ, ब्रँडेड दुकाने आहेत; तर आतील गल्ल्यांमध्ये स्वस्त दरात वस्तूंची विक्री करणाऱ्या लहान दुकानांचं वर्चस्व आहे. “आमच्या दुकानांसमोरील रस्त्यांवर फेरीवाले त्यांच्या वस्तू विकत आहेत. काही सरकारी विभागांचा त्यांना पाठिंबा आहे”, असे गौतम यांनी सांगितले.

स्वच्छतेचा मुद्दा गंभीर

तर, संजीव जैन (६३) यांचे याच भागात ज्वेलर्स आहे. ते म्हणाले, “या भागात शौचालये नाहीत. जी आहेत ती स्वच्छ नाहीत. महापालिकेचं त्याकडे लक्ष नाही. महापालिका भाजपाच्या ताब्यात होती तेव्हा शौचालयांची नियमित साफसफाई होत होती. मात्र, ‘आप’ची सत्ता आल्यापासून देखभाल होत नाहीये. बाजार परिसरात अस्वच्छता आहे. सर्व काही राम भरोसे चालले आहे. ही सगळी परिस्थिती आम्ही व येथील जनता पाहतेय. त्यामुळे आम्हाला वाटत आहे की यावेळी लोकांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा असेल.

दुकानदारांचा भाजपाकडे कल, फेरीवाले व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना ‘आप’ जवळची

राजौरी परिसरातील ४९ वर्षीय दुकानदार मदन कुमार सिंह म्हणाले, “आम्ही अनेक वर्षे काँग्रेसचे सरकार पाहिले आहे, गेल्या १० वर्षांपासून राज्यात ‘आप’चे सरकार आहे. परंतु, परिस्थिती काहीच बदललेली नाही. रस्ते तसेच आहेत, नाले तुंबलेले आहेत, सगळीकडे अस्वच्छता आहे. कुठेही नियोजन दिसत नाही, त्यामुळे आम्हाला वाटते की यावेळी सरकार बदलले पाहिजे. भाजपाला संधी मिळाली पाहिजे. बरेचसे दुकानदार याच विचारांचे आहेत. मात्र, आमच्या दुकानांसमोर उभे असलेले फेरीवाले मात्र ‘आप’ सरकारच्या छत्रछायेखाली आहेत. त्यांना ‘आप’ जवळचा पक्ष वाटतो. आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमधील रहिवासीदेखील ‘आप’धार्जिणे आहेत. मोफत वीज व मोफत पाण्यामुळे ते ‘आप’ सरकारवर खूश आहेत. बससेवेचा ते आनंद घेत आहेत, त्यामुळे निवडणूक खूप चुरशीची होईल यात शंका नाही.

Story img Loader