Raghav Chadha : आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ४८ जागा आणि आम आदमी पक्षाला २२ जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. मात्र, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. खरं तर दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही समावेश आहे.
दरम्यान, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीत एकत्र आहेत. मात्र, असं असतानाही दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले, त्यामुळे मतांमध्ये विभाजन झाल्याने दोन्ही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा आता विरोधी इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी केला आहे. मात्र, असे दावे आता केले जात असले तरी निवडणुकीच्या प्रचारात’आप’ आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. खरं तर आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सभांचा चांगलाच धडाका लावल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह आदी नेत्यांनी सभांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही आम आदमी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी यांनी जनतेने दिलेला जनादेश स्वीकारत असल्याचं सांगत प्रतिक्रिया देखील दिल्या. मात्र, या सर्व घडामोडी घडत असताना किंवा ‘आप’चं संस्थान खालसा होत असताना नेहमी केजरीवालांच्या बरोबर असणारे खासदार राघव चढ्ढा हे कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे खासदार राघव चढ्ढा नेमकं कुठे आहेत? याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. खासदार राघव चढ्ढा यांच्याबाबत राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न उपस्थित होत आहे. राघव चढ्ढा कुठे आहेत? केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, म्हणजे पक्षाच्या कठीण काळात खासदार चढ्ढा यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं. असंही बोललं जातं की त्यांची असं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाली होती, तेव्हा असो किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या महत्वाच्या क्षणी खासदार चढ्ढा गायब होते.
राघव चढ्ढा कुठे आहेत?
फस्टपोस्टच्या वृत्तानुसार, आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चढ्ढा हे एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नात सहभागी झाले आहेत. मात्र, एकीकडे राघव चढ्ढा लग्नाचा आनंद लुटताना दिसत असले तरी दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजय मिळवला. ७० पैकी ४८ जागा जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे ‘आप’ने फक्त २२ जागा जिंकल्या आहेत. आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांचा त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघात मोठा पराभव झाला. त्यांचा भाजपाच्या परवेश वर्मा यांच्याकडून ४ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे’आप’ला राजकीय संकटाचा सामना करावा लागत असताना राघव चढ्ढा यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच राघव चढ्ढा यांची ‘आप’च्या अत्यंत नाजूक क्षणांमध्ये अनुपस्थिती काही नवीन नाही असंही आता बोललं जात आहे.