Delhi Election Exit Poll : दिल्लीतील सर्व ७० विधानसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर, आता विविध वाहिन्या आणि संस्था एक्झिट पोल प्रसिद्ध करत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि आम आदमी पक्ष यांच्यात स्पर्धा दिसून येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचा एक्झिट पोल हा एक प्रकारचा अंदाज आहे. कधी एक्झिट पोल चुकीचे ठरतात तर कधी बरोबर येतात. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर होणार आहेत. अशात गेल्या तीन निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंदाज कितपत खरे ठरले होते ते पाहुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१३ मध्ये आम आदमी पक्षाने राजकारणात पदार्पण केल्यापासून एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीच्या व्याप्तीचा अचूक अंदाज व्यक्त करण्यात अपयशी ठरले आहेत. असे असले तरी २०१३ मध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असे अचूक भाकित एक्झिट पोलमधून करण्यात आले होते. मात्र, २०१५ आणि २०२० मध्ये दोन्ही निवडणुका चुरशीच्या होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. पण, या दोन्ही निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने एकतर्फी विजय मिळवला होता.

दिल्ली विधानसभा निवडणूक २०१३

२०१३ मध्ये चार एक्झिट पोलमध्ये भाजपा सरासरी ३५ जागांसह आघाडीवर होती. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी १७ जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात, भाजपाला ३२ जागा, आम आदमी पक्षाला २८ जागा आणि काँग्रेसला फक्त आठ जागा मिळाल्या होत्या. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते. पण अवघ्या ४८ दिवसांत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

२०१५ मध्ये काय होते एक्झिट पोलचे अंदाज

२०१५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सहा एक्झिट पोलनी ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, त्यांच्या विजयाची व्याप्ती कोणीही सांगू शकले नव्हते. या सहा पोलच्या सरासरीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ४५ जागा, भाजपाला २४ आणि काँग्रेस एका जागा मिळेल असे सांगण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात ‘आप’ने ६७ जागा जिंकल्या, तर भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या.

२०२० मध्ये एक्झिट पोल ‘आप’च्या बाजूने

२०२० मध्ये सरासरी आठ एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा ‘आप’ ५४ जागांसह दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर भाजपाला १५ जागा आणि काँग्रेसला जवळपास एकही जागा मिळणार नाही असे म्हटले होते. प्रत्यक्षात निकालात ‘आप’ला ६२ जागा आणि भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या. यामध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.