दिल्लीतील कथित मद्य-धोरण घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या तथा आमदार के कविता यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. मात्र ईडीने केलेले हे आरोप के कविता यांनी फेटाळले असून हे एक राजकीय षडयंत्र आहे. माझे वडील यात मुख्य टार्गेट आहेत, असा आरोप के कविता यांनी केला आहे.
पिल्लई आणि कविता यांच्यात जवळचे संंबंध
ईडीने दिल्ली मद्य-धोरण घोटाळ्याप्रकरणी हैदराबादमधील उद्योजक अरुण रामचंद्र पिल्लई यांना अटक केली आहे. पिल्लई आणि के कविता यांच्यात जवळचे संबंध असल्याचे म्हटले जाते. मद्यपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांशी व्यवहार करण्यासाठी तसेच दिल्ली सरकारकडून वितरण परवाने मिळवण्यात पिल्लई यांचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला आहे. याआधी के कविता यांचे माजी ऑडिटर बुचिबाबू गोरंटला यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> लाच प्रकरणी भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यावर काढलेली मिरवणूक ‘लाजिरवाणी’ बाब; भाजपा मंत्र्यांची कबुली
मी तपाससंस्थांना पूर्ण सहकार्य करणार- के कविता
“माझ्या वडिलांविरोधात हा राजकीय कट रचला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा माझे वडील चंद्रशेखर राव हे खरे टार्गेट आहेत. ते भाजपाला विरोध करतात, म्हणून हा सूड उगवला जात आहे. मात्र मी घाबरणार नाही. मी तपास संस्थांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मी कोणतीही चूक केलेली नाही,” असे के कविता म्हणाल्या आहेत.
के कविता कोण आहेत?
के. कविता या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले. तेलंगणा राज्यनिर्मितीच्या चळवळीला बळ मिळालेले असताना त्या भारतात परतल्या होत्या. या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. अनेकदा त्यांनी महिलांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यादरम्यानच त्यांचा तेलंगणा राज्याची संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जवळचा संबंध आला. २००६ साली तेलंगणा राष्ट्र समितीची (आता भारत राष्ट्र समिती) स्थापना झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी के. कविता यांनी तेलंगणा जागृती संघटनेची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून त्यांनी पुढे परंपरांचा प्रचार-प्रसार करण्याचे काम केले.
हेही वाचा >>> काँग्रेस नेत्याच्या मुलाचीच राहुल गांंधींवर टीका; लंडनमधील विधानाचा उल्लेख करत म्हणाले, “ते भारतात येऊन…”
के कविता यांचा राजकीय प्रवास
के. कविता यांनी २०१४ साली निझामाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या वेळी त्यांनी काँग्रेसचे दोन वेळा खासदार असलेले मधू गौड यास्की यांचा १.६७ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यांनी आपली खासदारकी चांगलीच गाजवली. मात्र शेकऱ्यांच्या मनात त्या स्थान निर्माण करू शकल्या नाहीत. हळदीच्या भावाचे नियमन करण्यासाठी वेगळ्या बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नराज होते. याच गोष्टीचा फायदा भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घेतला आणि धर्मपुरी अरविंद यांनी कविता यांना पराभूत केले होते.