Delhi MCD Mayor Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षाने दिल्लीची सत्ता काबीज करत ‘आप’ला धक्का दिला. एवढंच नाही तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या अनेक बड्या नेत्यांना देखील विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या हातातून दिल्लीची सत्ता गेल्यानंतर आता दिल्ली महानगरपालिकाही ‘आप’च्या हातातून जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी २५ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, महापौरपदाची ही निवडणूक न लढण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. दिल्ली महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (२१ एप्रिल) आम आदमी पक्षाने उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा केली. दिल्ली पालिकेत तुमचीच सत्ता स्थापन करा, अशू भूमिकाच ‘आप’ने घेतल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. तसेच आम आदमी पक्षाने हा निर्णय का घेतला? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
दिल्ली महापालिकेतील (एमसीडी) महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक वर्षाचा कार्यकाळ असलेल्या निवडणुका २५ एप्रिल रोजी होणार आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या एमसीडीच्या निवडणुकीत’आप’ने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने १०४ आणि काँग्रेसने ९ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. मात्र, पक्षांतर विरोधी कायदा एमसीडीला लागू होत नसल्यामुळे नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे संख्या बदलली. ‘आप’कडे आता ११३ तर भाजपाकडे ११७ आणि काँग्रेसकडे ८ नगरसेवक आहेत.
दरम्यान, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या तथा ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषदेत घेत दिल्ली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचवेळी त्यांनी भाजपाला चार इंजिनांचं सरकार चालवण्याचा आव्हान दिलं. आतिशी यांनी म्हटलं की, “एमसीडीच्या जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा त्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही भाजपा आता थांबत नसल्याचं चित्र आहे. भाजपाने ‘आप’च्या काही नगरसेवकांना त्यांच्या बाजूने घेत आणि मागच्या दाराने जिंकण्याचा प्रयत्न केला. आता ‘आप’लाही दिल्ली महापौरपदाची निवडणूक जिंकायची असेल तर घोडेबाजार करावा लागेल. मात्र, आम्ही आम आदमी पक्ष अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणार नाहीत. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे, असं आतिशी यांनी म्हटलं.
आतिशी यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा ‘आप’चे दिल्लीचे नेते सौरभ भारद्वाजही उपस्थित होते. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि भाजपामधील नगरसेवकांच्या संख्येत फारसा फरक नाही. हा फरक काँग्रेसबरोबर युती करून आम आदमी पक्ष भरून काढू शकतो. मात्र, तरीही ‘आप’ने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचवल्या आहेत.
महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त दिल्ली विधानसभेत पक्षाच्या संख्येनुसार नामांकित केलेले १४ आमदार आणि राजधानीतून लोकसभा आणि राज्यसभेचे सात खासदार असतात. दिल्लीत राज्यसभेच्या तिन्ही जागा ‘आप’कडे आहेत, तर लोकसभेच्या सातही जागा भाजपाकडे आहेत. पण आता नामनिर्देशित आमदारांच्या बाबतीत समीकरणे उलट झाली आहेत.
दरम्यान, ‘आप’चे सौरभ भारद्वाज यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की, “महापौर आणि उपमहापौर पदांवर विजय मिळवल्यानंतर भाजपा एमसीडीवर कब्जा करेल आणि दिल्लीत स्वतःचं ‘चार इंजन वाली सरकार’ चालवेल. त्यामुळे दिल्लीत कोणतंही काम न करण्याचं कारण भाजपा सांगू शकणार नाही. एमसीडीवर भाजपाचे सत्ता असण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही १५ वर्षे सत्ता होती. आता कोणतीही समस्या मग पाणी साचणे, कचऱ्याचे प्रश्न, स्वच्छता, वाहतूक कोंडी, कायदा आणि सुव्यवस्था, खून, खंडणी, बलात्कार, रस्ते, वीज, पाणीपुरवठा अशा प्रश्नांसाठी आता भाजपा जबाबदर असेल किंवा ते प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाकडे कोणतंही कारण नसेल, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं. आम आदमी पार्टीला एमसीडीमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे का? असं विचारलं असता भारद्वाज म्हणाले की, “आम्ही सध्या त्याबद्दल विचार करत नाही. आम्हाला वाटतं की भाजपा पोटनिवडणुकीसाठी फारसा उत्सुक नसेल.”
भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या संदर्भातील आपच्या आरोप फेटाळून लावले आणि महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार न देण्याचे हेच कारण असल्याचं सांगितलं. प्रवीण शंकर कपूर म्हणाले, “जेव्हा २०१७ ते २०२२ पर्यंत आम आदमी पार्टीचे नगरसेवक एमसीडीमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांच्यात कोणतेही मोठे पक्षांतर झाले नव्हते. यावरून स्पष्ट होतं की ते सत्तेसाठी आम आदमी पार्टी सोडत नाहीत, तर महानगरपालिकेत विकास सुनिश्चित करण्यासाठी असे करत आहेत.” तसेच दिल्ली भाजपाचे नेते वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं की दिल्लीला लवकरच भाजपाचा महापौर मिळेल.
दरम्यान, भाजपाने एमसीडीमधील सध्याचे विरोधी पक्षनेते राजा इक्बाल सिंग यांना महापौरपदाचे उमेदवार म्हणून आणि जय भगवान यादव यांना उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तसेच दुसरीकडे काँग्रेसने निहार विहारमधून तीन वेळा नगरसेवक राहिलेले मनदीप सिंग यांना महापौरपदासाठी आणि अरिबा खान यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे फक्त ८ नगरसेवक आहेत आणि जिंकण्याची शून्य शक्यता असतानाही काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.