नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल) सोसायटीचे, पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (पीएमएमएल) सोसायटी असे नामकरण करण्यात आले आहे. म्हणजेच ‘एनएमएमएल’मधून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव हटवण्यात आले आहे. याच कारणामुळे काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. भाजपाचे हे क्षुद्र राजकारण आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
“… म्हणून संग्रहालय नेहरूंना समर्पित”
दिल्लीतील नॅशनल कॉम्प्लेक्स परिसरात तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या संग्रहालयाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा ठराव गेल्या महिन्यात १५ जून रोजी संमत करण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. संग्रहालयाचे नाव बदलल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकार नेहरूंनी देशासाठी केलेल्या कामाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा केला. साधारण दोन दशके तीन मूर्ती भवन पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान राहिलेले आहे. त्यानंतर या निवासस्थानाचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते. हे संग्रहालय पंडित जवाहरलाल नेहरू यांना समर्पित करण्यात आले होते.
काँग्रेसकडून केला जाणारा हा दावा भाजपा, तसेच केंद्रीय मंत्र्यांनी फेटाळला आहे. आम्ही जवाहरलाल नेहरू यांचे महत्त्व कमी केलेले नाही. उलट आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांना योग्य तो सन्मान दिला आहे, असे स्पष्टीकरण भाजपाकडून दिले जात आहे.
साधारण दोन महिन्यांपूर्वी ठराव मंजूर
भाजपाचे नेते सूर्य प्रकाश हे पीएमएमएल समितीचे उपाध्यक्ष आहेत. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल) सोसायटीचे पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (पीएमएमएल) सोसायटी, असे नामकरण केल्यानंतर त्यांनी एक ट्वीट केले. लोकशाहीकरण, तसेच विविधतेचा पुरस्कार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे सूर्य प्रकाश ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले. तसेच पीएमएमएल समितीने कोणताही ठराव मंजूर केल्यानंतर साधारण एका महिन्याने पुन्हा एकदा पीएमएमएल समितीने संबंधित ठरावावर चर्चा करणे अपेक्षित होते. त्यामुळे १५ जूननंतर आम्ही पुन्हा एकदा १८ जुलै रोजी या ठरावावर चर्चा केली आणि त्याला संमती दिली. त्यानंतर कायदशीर प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही हे नाव बदलले आहे. हे नाव आता रजिस्ट्रार ऑफ सोसायटीकडे गेले आहे, असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.
जयराम रमेश यांची मोदींवर टीका
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपाकडून क्षुद्र राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी हे घाबरलेले आहेत, अशा शब्दांत टीका केली. “नरेंद्र मोदी यांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षित वाटत नाहीये. मोदींचा नेहरू यांनी केलेल्या कामाला नाकारणे हा एकमेव अजेंडा आहे. मात्र, नेहरू यांना नाकारण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी त्यांचे काम कायम जिवंत राहील. नेहरू आगामी अनेक पिढ्यांना प्रोत्साहन देत राहतील,” असे जयराम रमेश म्हणाले.
“नरेंद्र मोदी, काँग्रेसमध्ये एकच फरक”
जयराम रमेश यांच्या या टीकेला भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी जशास तसे उत्तर दिले. “काँग्रेस आणि नरेंद्र मोदी यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत एकच फरक आहे. तो म्हणजे काँग्रेस पक्ष फक्त नेहरू आणि नेहरूंच्या घराण्याचा विचार करतो. तर मोदी यांनी देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाचा सन्मान केला आहे. त्यांनी संग्रहालयात याआधीच्या प्रत्येक पंतप्रधानाला स्थान दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
“… म्हणून ते नाव बदलण्याचा प्रयत्न करतायत”
काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही भाजपावर टीका केली. राजदचे नेते मनोज कुमार झा यांनी नेहरू हे लोकांच्या स्मृतीत कायम राहतील, अशी प्रतिक्रिया दिली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीदेखील भाजपावर टीका केली. “एनडीए महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर यांच्यासारखा इतिहास रचू शकत नाही. म्हणूनच नावे बदलली जात आहेत,” असे राऊत म्हणाले.
“निधन झालेल्या व्यक्तीचा अपमान न करण्याची आपली संस्कृती”
आप पक्षानेही भाजपावर टीका केली आहे. “निधन झालेल्या व्यक्तीचा कोणत्याही पद्धतीने अवमान करू नये, अशी आपली संस्कृती सांगते. जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या जडणघडणीत मोठे आणि महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. संग्रहालयाचे नाव बदलणे हे क्षुद्र राजकारण आहे,” असे सौरभ भारद्वाज म्हणाले.
“पंतप्रधानपद हे कोणा एका व्यक्तीचे नसते”
तर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी काँग्रेस, तसेच विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिले. “देश हा कोणा एकाचा नसतो. देश हा संस्था आणि व्यवस्थेने बनतो. ही लोकशाही आहे. पंतप्रधानपद हे कोणा एका व्यक्तीचे नसते. हे पदच एक व्यवस्था आहे. याच कारणामुळे ते संग्रहालय देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित करण्यात आले आहे,” असे अर्जुन मुंडा म्हणाले.