मोहनीराज लहाडे
नगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’, असे करावे या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज संघटनांनी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यात ‘नामांतर रथयात्रा’ काढण्यात आली आहे. त्याची सुरुवात आज, गुरुवारी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली. समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला जाणार आहे. समाजातील प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला बाजूला सारून तरुणांच्या संघटना यामध्ये उतरल्या आहेत.
अहिल्यादेवी, चौंडीचा आधार घेत समाजातील अनेकांचे राजकीय नेतृत्व प्रस्थापित झाले. मात्र अलीकडच्या काळात त्यांचे, समाजाची प्रमुख मागणी असलेल्या आरक्षणासह इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले, त्यासाठीच्या चळवळी थंडावल्या. त्याची सल समाजाच्या मनात आहे. नगरच्या नामांतराचे निमित्त शोधत आरक्षणाच्या मुद्द्यावर, समाजाचे पुन्हा एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या प्रयत्नातून आणखी कोणते नवे राजकीय नेतृत्व उभारी घेणार, याकडे समाजातील प्रस्थापित नेतृत्व, रथयात्रेकडे लक्ष ठेवून असतील.
हेही वाचा… भाजपच्या मंत्र्याला बारामतीमधील पवारांच्या संस्थेचे आकर्षण
नगरचे नामांतर, जिल्हा विभाजन यापेक्षा विकासाचे अन्य प्रश्न महत्त्वाचे आहेत, जिल्ह्यापेक्षा बाहेरचेच लोक नामांतराची मागणी करत आहेत, अशी भूमिका घेत भाजप नेते, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनीही नामांतरापेक्षा जिल्हा विभाजन आधी करा, अशी भूमिका घेतल्याने ठिणगी पडली आहे. ज्यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात करण्यात आली ते विठ्ठल बिरदेव देवस्थानचे (पट्टणकलोडी, कोल्हापूर) पुजारी नारायण खानू मोठेदेसाई यांनी नामांतराच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. नामांतराच्या पाठिंब्यासाठी नामांतर कृती समितीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ठराव गोळा करण्याचे मोहीम सुरू केली आहे. ११ दिवसात ७०० किमी. अंतर पार करून, गावागावातून रथयात्रा नेली जाणार आहे.
हेही वाचा… सोलापुरात दोन्ही काँग्रेसमधील वाकयुद्धात सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली
आरक्षण, सोलापूर विद्यापीठाचे नामांतर, शेळी-मेंढी महामंडळ, त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद, प्रशिक्षण केंद्र, यशवंतराव होळकर घरकुल योजना आदी विविध मागण्यांसाठी झालेल्या चळवळींची सुरुवात चौंडीतून करण्यात आली होती. पंढरपूर ते बारामती पदयात्रा, आरक्षण हक्क परिषद, रथयात्रा अशा मोहिमा यापूर्वी राबवल्या गेल्या. त्यातून अण्णा डांगे, महादेव जानकर, डॉ. विकास महात्मे, शिवाजीबापू शेंडगे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर असे विविध राजकीय नेतृत्व पुढे आले. याच ठिकाणी महादेव जानकर-प्रकाश शेंडगे, महादेव जाणकर-राम शिंदे यांच्यातील राजकीय श्रेयवादासह गोपीचंद पडळकर-शरद पवार यांच्यातील वादही राज्यभर गाजले. मात्र अनेक मागण्या प्रलंबितच राहिल्या. त्याऐवजी समाजातील प्रस्थापित नेतृत्वांचे विचार मंच, प्रतिष्ठाने निर्माण झाली. अहिल्यादेवींची पुढील वर्षी ३०० वी जयंती आहे. नामांतराची मागणी या निमित्ताने तडीला नेण्याचा आशावाद समाजात आहे.
हेही वाचा… लिंगायत मतपेढीला नव्याने झळाळी
विधिमंडळाचे अधिवेशन महिनाखेरीस सुरू होत आहे. गेल्या अधिवेशनात नगरच्या नामांतराचा विषय अचानकपणे उपस्थित करण्यात आला. त्याला शिंदे-फडणवीस सरकारनेही अचानकपणे अनुकूल प्रतिसाद दिला. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, त्या आघाडीवर मात्र अद्याप काही हालचाल झालेली नाही. येथे काहीशी प्रतिकूल परिस्थिती आहे. जिल्हा परिषद सभागृह अस्तित्वात नाही तर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी सत्तेत आहे. यातील शिवसेनेने, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी नगरचे नामांतर ‘अंबिकानगर’ करावे अशी मागणी केली होती. आताही अहिल्यादेवींचे नाव पुढे आल्यानंतर विविध समाजातून वेगवेगळ्या नावांची मागणी पुढे आलेली आहे. त्यातूनही वादाच्या ठिणग्या पडण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.
नामांतर रथयात्रेसाठी धनगर समाज सेवा संघ, अहिल्यादेवी होळकर वधुवर मेळावा संघ, यशवंत सेना, अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान आदी संघटनांसह विविध पक्षातील खालच्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभाग जमा करत नामांतर कृती समितीची स्थापना केली आहे. वातावरण निर्मितीसाठी बैठका घेतल्या. अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत सादर केली जात आहे. मात्र प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला ठेवल्याने प्रतिसाद कसा मिळतो आहे, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते. एक प्रकारे समाजातील प्रस्थापितांविरोधात आव्हानच उभे केले जात आहे.