इंदापूर : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सव्वाकोटी महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. या योजनेद्वारे दर वर्षी ४६ हजार कोटी रुपये महिलांना मिळणार आहेत. हाच पैसा पुन्हा बाजारात येऊन बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार आहे, असे माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार दत्तात्रेय भरणे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की तळागाळातील घटकामधील गोरगरीब महिलांना आर्थिक अडचणीच्या काळात त्यांच्या हातात विविध गरजांसाठी चार पैसे असावेत, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. लोकसभेत निकाल दिला तो मतदारांचा अधिकार आहे. त्या वेळी संविधान बदलणार, असा प्रचार करण्यात आला. केंद्र सरकारने सीएए कायदा आणला, त्या वेळी गैरसमज पसरवला गेला. बाहेरील देशातील आपल्या लोकांना भारतात आणायला नको का? त्यांना इकडे आणणार आणि तुम्हाला तिकडे पाठवणार, असा गैरसमज अल्पसंख्याक समाजात पसरविण्यात आला. मात्र, आता विधानसभेला अशा प्रचाराला बळी पडू नका. महायुतीचे अधिकाधिक आमदार निवडून द्या. म्हणजे आम्ही सुरू केलेल्या योजना सुरू ठेवता येतील, आता ते तुमच्या हातात आहे, असेही पवार म्हणाले.