आसाराम लोमटे

परभणी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा शेजारच्या जिल्ह्यांमध्ये येऊन गेली मात्र परभणी जिल्ह्यात या यात्रेचा एकही कार्यक्रम अद्याप झाला नाही यावरून जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी एका तरी मतदारसंघात महायुतीमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला असताना या पक्षाने पाथरीतून लढण्याचा दावा केला आहे. विशेषतः महायुतीतलाच एकनाथ शिंदे गटही या मतदार संघात सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या या दोन पक्षात जागेसाठी मोठी रस्सीखेच भविष्यात पहायला मिळणार आहे.

जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर (आमदार मेघना बोर्डीकर, भाजप), गंगाखेड (आमदार रत्नाकर गुट्टे, रासप) हे दोन मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. पाथरीत सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. महायुतीत गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपपेक्षाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात उमेदवारीसाठी चुरस सुरू आहे. शिवसेनेचे सईद खान यांना राज्याच्या अल्पसंख्य आघाडीचे नेतृत्व देऊन आणि विकास निधीतही झुकते माप देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागे पाठबळ उभे केले आहे. या मतदारसंघात बाळासाहेब यांची शिवसेना या पक्षाचे राजकीय कार्यक्रम सतत सुरू आहेत. त्यामुळे शिंदे गट पाथरीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत असतानाच आता महायुतीतल्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात पाथरीच्या रूपाने किमान एक तरी जागा लढवलीच पाहिजे असा निश्चय केला आहे.

हेही वाचा >>>Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

संजय बनसोडे यांच्या रूपाने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. अलीकडेच राजेश विटेकर या तरुण चेहऱ्यास राष्ट्रवादीने विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली. विशेष म्हणजे पाथरी हे विटेकरांचे कार्यक्षेत्र आहे. या गुंतवणुकीचा परतावा म्हणून तसेच हा जिल्हा आपल्यासाठी निरंक राहू नये म्हणून राष्ट्रवादीकडून पाथरीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

हा आमच्या हक्काचा मतदार संघ

पाथरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायती, सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. पाथरीची जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढवणार आणि जिंकून आणणार. हा मतदारसंघ आमच्या हक्काचा आहे.-आमदार राजेश विटेकर