मुंबई : आमदार शपथविधीवर शनिवारी बहिष्कार टाकलेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी रविवारी शपथ घेतल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार नसल्याची खात्री पटली का, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार हे कमी मतांनी निवडून आले. मग तेथे ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाला, असे म्हणायचे का? विरोधकांनी मतदान यंत्रांचे रडगाणे थांबवून जनतेने दिलेला कौल स्वीकारावा, असा सल्लाही शिंदे यांनी विरोधकांना दिला.
विधानसभेत झालेल्या दणदणीत पराभवानंतर विरोधकांनी मतदान यंत्रांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करून मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावकऱ्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही सवाल करीत टीका केली आहे.
हेही वाचा >>>आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
शिंदे म्हणाले, जेव्हा विरोधी पक्षांना विजय किंवा अधिक जागा मिळतात, तेव्हा ईव्हीएम यंत्रे चांगली असतात आणि पराभव होतो, तेव्हा खराब असतात. झारखंड, कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधी पक्षांना यश मिळाले, तेव्हा मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी कोणी करीत नाही. हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग येथे त्यांच्या बाजूने निकाल लागला, तर यंत्रणा चांगली आणि निकाल विरोधात गेला, तर न्यायालयावरही आरोप केले जातात. हे लोकशाहीला घातक आहे.
‘लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएम गैरव्यवहार?’
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकसभा व या निवडणुकीत मिळालेली मते व जागा आदी तपशील देऊन शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात केवळ दोन लाख मतांचा फरक असून आम्हाला १७ आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम गैरव्यवहार आहे का? विरोधकांनी आता ईव्हीएमवर खापर फोडणे थांबवावे, असे शिंदे यांनी नमूद केले.