वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रात सध्या एक वेगळेच राजकीय चित्र दिसत आहे. भाजपचे दादाराव केचे येथील आमदार असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचीच सध्या या मतदारसंघात चर्चा आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून वानखेडे यांच्याकडे बघितले जात आहे. गत दहा वर्षांपासून ते फडणवीस यांच्यासोबत सावलीसारखे वावरत असतात. त्यांचा शब्द प्रशासनातही प्रमाण मानला जातो. अशा या प्रभावशाली वानखेडे यांनी आर्वीची परिक्रमा वाढवली आहे. त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन आर्वी मतदारसंघातील आर्वी, आष्टी व कारंजा या तीनही तालुक्यातील भाजपचेच कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्यसुद्धा अडचण आली की वानखेडे यांच्याकडे धाव घेतात. या तीनही तालुक्यात वानखेडे यांनी आपल्या प्रभावाने कोट्यवधींच्या विकास योजना मंजूर केल्या. नागरिक त्यांना निवेदने देतात तेव्हा ते तात्काळ प्रशासनास सूचना करीत काम मार्गी लावतात. त्यांचे प्रशंसक तर ‘सुमीतदादा’चे कार्य असे सांगत समाजमाध्यमांवर अभिमानाने प्रसारित करतात.

हेही वाचा – मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी शिवसेना आणि काँग्रेसवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

आ. केचे त्यांच्याकडे येणारे व वानखेडेंची भेट घेणारे यांची तुलना केल्यास वानखेडेंचे पारडे जड भरते. उपमुख्यमंत्र्यांचे खास म्हणूनच वानखेडे यांना लोक पसंत करत असल्याचे आता काही लपून राहिले नाही. परंतु, वानखेडे यांचे नेत्यासारखे वागणे विरोधकांना खपत नाही. ते टीका करतात. त्यावर वानखेडे समर्थकांचा प्रतिवाद असतो की, वानखेडे भूमीपूत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण इथल्याच मराठी शाळेत झाले. त्यांच्या प्रभावाचा फायदा आर्वीसाठी होत असेल तर चुकीचे काय? आर्वीचा जन्म व वर्धेची सासुरवाडी या दुहेरी नात्याने त्यांचा वावर सध्या वाढला आहे. असे असले तरी पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्या आमदार केचेंना डावलून वानखेडे यांचा पर्याय देण्याचे कारण काय, असा प्रश्न भाजपच्याच एका गटातून विचारला जातोय.

भाजप नेतृत्व नेहमी भाकरी फिरविण्याच्या मानसिकतेतून नवे चेहरे पुढे करीत असल्याचा दाखला दिला जातो. खुद्द वानखेडे म्हणतात, मी राजकारणाचा विचार केलेला नाही. आर्वीसाठी विकास कामे करणे सहजशक्य होत असेल तर ती केली पाहिजे. भाजपमध्ये वरून कोणी टपकत नसतो. माझ्या संभाव्य उमेदवारीबद्दल होत असलेली चर्चा अकारण होत आहे. वानखेडे यांचा हा खुलासा सकृतदर्शनी पटण्यासारखा असला तरी फडणवीस यांच्या संमतीखेरीज वानखेडेंच्या कामाचा झपाटा वेग घेऊ शकत नाही. आज राजकीय वर्तुळात वानखेडे यांची चर्चा ‘नेता’ म्हणूनच होत आहे.

हेही वाचा – एसडीपीआयला कर्नाटकात खाते उघडण्याची अपेक्षा

गेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सचिव असलेले सुधीर दिवे यांनी केचे यांना घायकुतीस आणले होते. विविध कार्यक्रम व उपक्रमाचा धडाका त्यांनी लावला होता. त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी खात्रीही दिली जात होती. मात्र केचे वरचढ ठरले. आता पुन्हा एक सचिव त्यांच्यासमोर अप्रत्यक्ष उभा ठाकला आहे. केचे या छुप्या आव्हानाचा कसा सामना करतात, यावर त्यांचे पुढील राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.

फडणवीस यांचे माजी सचिव अभिमन्यू पवार हे गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. पवार आमदार झाल्याने दुसरे सचिव वानखेडे आमदार होणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Story img Loader