Dera chief Ram Rahim get Parole before Election: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला एक आठवडा उरला असताना डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. हरियाणामधील रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून त्याला एक महिन्याचा पॅरोल मिळाला आहे. यावेळी पहिल्यांदाच पॅरोल मिळाल्यानंतर डेरा सच्चाचे सिरसा येथील मुख्यालयात राहण्याची परवागनीही देण्यात आली आहे. आपल्या दोन शिष्यांवर सिरसा येथील आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी २०१७ साली राम रहीमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेकदा त्याला तुरुंगातून ‘पॅरोल’ किंला ‘फर्लो’ मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगायोगाने राम रहीमला मिळणारे ‘पॅरोल’ किंला ‘फर्लो’ हे नेमके हरियाणा, पंजाब किंवा राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळालेले आहेत. या तीन राज्यातील आणि विशेषतः हरियाणामधील काही मतदारसंघात डेरा सच्चाचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीआधी राम रहीमला २० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. २०२२ साली गुरमीत राम रहीम तीन वेळा तुरुंगातून बाहेर आला होता. फेब्रुवारी महिन्यात पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी त्याला पहिल्यांदा २१ दिवसांचा फर्लो मिळाला. त्या निवडणुकीत ११७ सदस्य असलेल्या विधानसभेत आम आदमी पक्षाने ९२ जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेसला १८, शिरोमणी अकाली दलाला ३ आणि भाजपा-एनडीएला केवळ दोन जागी विजय मिळविता आला होता.

त्यानंतर त्याच वर्षी जून महिन्यात त्याला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला. त्यावेळी राज्यात पंचायत निवडणुका होत्या. हरियाणामध्ये १८ महानगरपालिका, २६ नगर परिषदांची निवडणूक लागली होती. त्यावेळी त्याला उत्तर प्रदेशच्या बागपत येथील आश्रमात राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते. मात्र, रोहतक जिल्ह्यात ऑनलाइन सत्संग घेतल्यामुळे आणि भाजपाचे नेते व कर्नालचे माजी महापौर रेणू बाला गुप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राम रहीमचे दर्शन घेतल्यामुळे वाद उद्भवला होता.

२०२२ मध्येच आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी त्याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला. माजी मुख्यमंत्री भजन लाल यांच्या कुटुंबाचा हा बालेकिल्ला आहे. आदमपूर पोटनिवडणुकीत भजन लाल यांचे नातू भव्य बिश्नोईने भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयही मिळविला.

पुढच्याच वर्षी हरियाणात काही ठिकाणी स्थानिक पंचायतीच्या निवडणुका होणार होत्या. त्याआधी जुलै २०२३ मध्ये राम रहीमला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला. नोव्हेंबर २०२३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा त्याला २१ दिवसांची फर्लो रजा मिळाली. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०० पैकी ११५ जागांवर विजय मिळवत सत्ता प्राप्त केली. तर काँग्रेसला केवळ ७० जागा मिळाल्या.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत डेराने हरियाणा राज्यात भाजपाला जाहीर पाठिंबा दर्शविला होता. भाजपाने हरियाणामधील १० पैकी सात जागांवर विजय प्राप्त केला. तर काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या. तर सिरसा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली जागा मात्र भाजपाला गमवावी लागली. याठिकाणी आयएनएलडी पक्षाचा विजय झाला. पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही डेराने भाजपाला पाठिंबा दिला. यावेळी ९० आमदार असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजपाने सत्ता स्थापन केली. २००९ साली त्यांचे केवळ ४ आमदार होते, ते वाढून भाजपाची संख्या ४७ वर पोहोचली. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे काही नेते डेरा सच्चाच्या मुख्यालयात गेल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

मात्र, २०१७ साली राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर २०१९ साली डेरा सच्चाने लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाला अधिकृतपणे पाठिंबा दिला नाही. तेव्हा भाजपा आणि डेरा सच्चा यांच्यामध्ये सौहार्दता उरली नसल्याची चर्चा होती. मात्र, या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत डेरा सच्चाने भाजपाला पाठिंबा दिला होता.

राम रहीमला राजकीय वरदहस्त

तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारावासात राम रहीमला कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा मिळत नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला वागणूक देण्यात येते. सरकारच्या २०२३ मधील आकडेवारीनुसार, हरियाणाच्या तीन केंद्रीय कारागृहांत ५,८४२ आणि १७ जिल्हा कारागृहांत २,८०१ कैदी आहेत. त्यापैकी २,००७ कैदी पॅरोलवर आणि ७९४ कैदी फर्लोवर बाहेर आहेत. काही कैद्यांना दोन्ही प्रकारची रजा आणि तीही वर्षातून अनेकदा मिळाली आहे. वरील आकडेवारीत तात्पुरत्या स्वरूपात तुरुंगातून मुक्त केलेल्या १८३ कैद्यांना वगळण्यात आले आहे.

राम रहीमला राजकीय वरदहस्त आहे. हरियाणाचे कारावास मंत्री आणि सध्या भाजपावासी असलेल्या रंजीत सिंह चौटाला यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रनिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. रनिया विधानसभा मतदारसंघ सिरसा जिल्ह्यात येत असून, याच जिल्ह्यात डेरा सच्चाचे मुख्यालय आहे. रंजीत सिंह हे देशाचे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे सुपुत्र आहेत. तसेच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर हेदेखील राम रहीमच्या पॅरोल आणि फर्लोला समर्थन देतात.

२०१७ साली २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आजवर ११ वेळा राम रहीम पॅरोल किंवा फर्लोवर बाहेर आलेला असून त्याने एकूण २७५ दिवस तुरुंगाच्या बाहेर काढले आहेत.