सतीश कामत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला वहिला रत्नागिरी दौरा गेल्या शुक्रवारी पार पडला. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी तालुक्यासाठी सात-आठशे कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. त्यापैकी नवीन फारच थोड्या होत्या. बहुतेक योजनांसाठी निधी मंजुरी आणि तरतूद आधीच झाली आहे. मुख्यमंत्रीमहोदयांनी या रकमांची बेरीज करून आपल्या दौऱ्यामुळे रत्नागिरीसाठी घसघशीत निधी मिळाल्याचा आव आणला. कारण या दौऱ्याचा मुख्य हेतू शिंदे गटाचे स्थानिक आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना बळ देणे हा होता. म्हणूनच निधी जाहीर झालेले बहुतेक योजना फक्त रत्नागिरी तालुक्यातील आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सामंतांनी शक्ती प्रदर्शनात काहीही असलं ठेवली नव्हती . पण दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकूण वावर आणि संध्याकाळी जाहीर मेळाव्यातील भाषण प्रभावहीन झाल्याने अपेक्षित परिणाम साधला गेला नाही.

मूळ नियोजित कार्यक्रमापेक्षा सुमारे दीड तास उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांचं शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास रत्नागिरीत आगमन झालं. इथे आल्यानंतर रिवाजानुसार त्यांनी येथील मारुती मंदिर सर्कलमधल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रत्नागिरीची ग्रामदेवता असलेल्या श्री भैरीबुवा देवस्थानात जाऊन दर्शन घेतलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामागे अर्थातच रत्नागिरीकरांना भावनिक साद घालण्याचा हेतू होता. यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासयोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जाहीर केलं. अर्थात ते संपूर्ण कोकण विभागासाठी असणार आहे. त्यामुळे या विभागातील पाच जिल्ह्यांपैकी रत्नागिरीच्या वाट्याला नेमकं काय आणि किती येणार, हा प्रश्नच आहे. पण कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाचं भिजत घोंगडे कायम असताना या प्राधिकरणाच्या वेगळ्या संकल्पनेमुळे थोडी आशा निर्माण होण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा… शेतकऱ्यांशी नियमित संपर्काद्वारे मतांची पेरणी, भाजप किसान मोर्चाचा उपक्रम

रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तारांगणाचं उद्घाटन आणि नियोजित अभियांत्रिकी महाविद्यालयाचं भूमिपूजन हे पठडीतले कार्यक्रम उरकल्यानंतर येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभा, हा खरं तर या दौऱ्याचा उत्कर्ष बिंदू ठरणं अपेक्षित होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी त्या दृष्टीने उत्तम वातावरण निर्मिती केली होती. क्रीडा संकुलाच्या मैदानावर सर्व बाजूंनी भगवे झेंडे आणि मुख्यमंत्री शिंदे, तसेच स्वतः सामंत यांचे कट आउट लावण्यात आले होते.मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं आणि डोक्यावर भगवी टोपी होती. सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. सुमारे १५ ते २० हजार क्षमतेच्या या मैदानावर सर्व बाजूंनी गर्दी ओसंडून वाहत होती. या गर्दीला मुख्यमंत्री येईपर्यंत थांबवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचा ऑर्केस्ट्राही ठेवला होता. मोठ्या प्रकाशझोतांमुळे मैदान उजळून निघालं होतं. गर्दीमुळे मैदानाकडे जाणार रस्ते वाहतुकीला बंद करावे लागले होते. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला सभा जिंकण्यासाठी याहून अनुकूल वातावरण असू शकलं नसतं. पण मुख्यमंत्री शिंदे त्याचा लाभ उठवण्यात अपयशी ठरले. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांची जंत्री किंवा उद्योगांबाबतच्या सामंजस्य करारांची उजळणी करण्यातच त्यांनी बराचसा वेळ खर्च केला. ‘आमच्या कामांची होते चर्चा, बिनकामाचे लोक काढतात मोर्चा’ हे एकमेव रामदास आठवले स्टाईलचं वाक्य वगळता त्यांच्या भाषणामध्ये फारसा जीव नव्हता.

हेही वाचा… कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत तरुण नेतृत्वाचा प्रभाव

महाविकास आघाडीतर्फे शनिवारी असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडींबाबत ते भाष्य करतील, विरोधकांचा समाचार घेतील अशी अपेक्षा होती. ती पूर्णपणे फोल ठरली. विशेषतः कोकणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बऱ्यापैकी पकड असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही शिवसैनिक मूळ संघटनेला धरून आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सामंत शिंदे गटाला जाऊन मिळाले असले तरी सैन्य अजूनही जागेवर आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी सामंतांना राजकीय बळ देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणं अपेक्षित होतं. पण त्यात ते खूपच कमी पडले. किंबहुना, त्याऐवजी त्यांनी विकासाचं दळण लावल्याने सभा कंटाळवाणी झाली. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी, खरंतर नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. मुंबईसह कोकण, हा शिवसेनेच्या प्रभावाखालील मुख्य टापू आहे. इथे घाव घातला तर फांद्या खाली यायला फारसा वेळ लागणार नाही. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने आक्रमक राजकीय पवित्र घेणं अपेक्षित होतं. पण फुटबॉलच्या भाषेत बोलायचं तर मंत्री सामंतांनी चांगला पास देऊनही मुख्यमंत्र्यांनी गोल मारण्याची संधी दवडली .

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite creating a good atmosphere the chief minister eknath shindes visit was ineffective print politics news asj