संजीव कुळकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : काँग्रेसचे युवानेते खा. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले असून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलन केले. मात्र नांदेडमध्ये या पक्षांनी आंदोलन तर सोडा, साधा खा.गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधही केला नाही. भाजप व मित्रपक्षांच्या या उदासीनतेची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी भाजपसह मित्रपक्ष गपगार झाले आहेत.

खा. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते, विविध ठिकाणी आक्रमक पध्दतीने आंदोलने केली जात असताना नांदेडमधील भाजप, शिवसेना (दोन्ही गट) यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका मात्र मवाळच दिसून आली. ना निषेध ना कोणते आंदोलन, असे उदासीन चित्र नांदेडमध्ये पहावयास मिळाले.
भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या काही दिवसांपूर्वी नांदेडात आल्या होत्या, त्यांनीच काय तो सावरकरांबद्दलचा आदर दाखवत काही माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. देशभरात व राज्यभरात सगळीकडे आंदोलनाची लाट होती, त्या वेळी नांदेडमधील भाजपसह जुन्या व नव्या मित्रपक्षाच्या गोटात असलेला शुकशुकाट व त्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

हेही वाचा: पुण्यात रिपब्लिकन गटात अस्वस्थता?

ही भाजप मित्रपक्षांची उदासीनता होती, की काँग्रेसच्या नेत्यांबद्दल काही बोलायचेच नाही अशी रणनीती होती, हेही स्पष्ट झाले नाही. भाजप व मित्रपक्षांचे मिळून जिल्ह्यात पाच आमदार, दोन खासदार व अनेक पदाधिकारी आहेत, स्वातंत्र्यवीरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करूनही यापैकी कोणीही निषेधासाठी पुढे आले नाही, ही बाब असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह सावरकरप्रेमींना कमालीची खटकली आहे. भाजप व मित्रपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबीची दखल घेऊन स्थानिक नेत्यांच्या उदासीनेताचा समाचार घ्यावा, असा सूर अनेकांनी आळवला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the statement about veer savarkar the ruling mp nanded silent among the mla rahul gandhi print politics news tmb 01