छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात अशोक पाटील राज्यमंत्री असताना कोणी तरी ‘शिवसेना’ असा लिहिलेला फलक काढून टाकला आणि सुरेश नवले तिरीमिरीत शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. आंदोलन असे नव्हते. पण प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात एवढा राग होता की ते त्यांच्या तोंडावर थुंकले. पुढे ते नारायण राणे यांचे बोट पकडून आमदार झाले. आता तेही कॉंग्रेसमार्गे पुन्हा सत्ताधारी गटात स्थिरावले आहेत. आंदोलनास तेव्हा ‘आवाज कुणाचा’ ही घोषणा दिली की, प्रतिसाद मिळायचा ‘शिवसेने’चा. त्या घोषणेला आता सहानुभूती असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आवाज क्षीण होत आहे. संघटनेतील आंदोलनाची धग संपत जाऊ लागली आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात पाय रोऊन उभे ठाकण्याची ‘शिवसेना स्टाईल’ नेते आणि कार्यकर्ते ३८ वर्षांनंतर विविध पातळ्यांवर चाचपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दहा महिन्यांत ‘गद्दार’, ‘मिंदे गट’ असे म्हणत शिवसेनेला संघटन बांधणीसाठी स्वतंत्र सभा घ्याव्या लागत आहेत. ‘गेली दहा महिने पक्षाच्या नावासह अस्तित्वाच्या लढाईत वेळ गेल्याने काही आंदोलने हाती घेता आली नाहीत. पण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह बहुतांश नेते बांधावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात आहेत. त्यामुळे आंदोलन झाले नाही तरी शिवसेना वाढत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.चौकात अधूनमधून घोषणाबाजी आणि तुझ्या ‘बाईट’ विरोधात ‘माझी बाईट’ असा खेळ माध्यमअंगणी सध्या रंगला आहे.

हेही वाचा – Karnataka : भाजपा २०२४ मध्ये विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार? सदानंद गौडांनी स्वपक्षावरच केले आरोप

मराठवाड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आता केवळ दोन खासदार आणि तीन आमदार अशी ‘निष्ठावंतां’ची संख्या शिल्लक आहे. उदयसिंह राजपूत, कैलास पाटील, राहुल पाटील, हे तीन आमदार आणि संजय जाधव आणि ओम राजेनिंबाळकर हे दोन खासदार. सोडून गेलेल्यांची संख्या खूप अधिक आहे आणि सत्ताधारी गटातील ‘शिवसेने’च्या बरोबर जाणाऱ्यांमध्ये संदीपान भुमरे, रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. संघटनात्मक पातळीवरील काही कार्यकर्तेही निघून गेले. मात्र, अजूनही शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली. अगदी केरोसीन विक्रेत्यांपासून ते वाहनचालक अशा व्यक्तींना विधानसभेची उमेदवारी मिळाली. काहीजण आमदार झाले. सत्तेची फळे चाखणाऱ्या काही शिवसेना नेत्यांची मग शिवसेनेत वाढ होत गेली. पण बांधणी करणाऱ्यांमध्ये पुढाकार घेणारे दिवाकर रावते आता कुठे दिसत नाही. जुने शिवसैनिक अधून-मधून किंवा निवडणुकीच्या काळातील ‘निष्ठावंतांच्या मेळाव्यात’ गळ्यात भगवा गमछा घालून आवर्जून येतात. जो पक्ष सोडून जातो त्याची उणीदुणी सांगत शिवसेना वाढत जात असे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नावासाठी लढत आहे. सेनेमध्ये फूट पडली असली तरी शिवसेनेचे सहानुभूतीदार मात्र वाढत आहेत. मात्र, अजूनही सेनेतील अंतर्गत वाद कमालीचे टोकदार आहेत.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! २३ जूनला विरोधकांची बैठक; राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार!

छत्रपती संभाजीनगर येथील ३८ व्या वर्धापन दिनी खासदार संजय राऊत जेव्हा भाषणाला उभे ठाकले होते तेव्हा सभागृहातील वरची ‘गॅलरी’ रिकामी होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीही खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावर त्यांनी नेत्यांना खडे बोलही सुनावले. सेनेविषयी सहानुभूती असतानाही वर्धापन दिनी शिवसेनेतील धग मात्र पूर्वीसारखी राहिली नाही, असेच चित्र दिसून येत आहे. कापूस, कांदा, सोयाबीन हे शेतीतील प्रश्न गंभीर आहेत. पण त्यावर शिवसेना भूमिका घेताना दिसत नाही. विविध योजना रेंगाळल्या आहेत, हे नेते भाषणातून सांगतात. आरोप-प्रत्यारोपही होतात, पण मराठवाड्याचा प्रश्न घेऊन सेना उभी राहत नसल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the sympathy with uddhav thackeray group in marathwada it is not effective print politics news ssb