इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. जागावाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नाही.
इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल होऊ लागली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच अधिक भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाल्यावर विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल. शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल.
आघाडीत मतभेद होतील अशी कोणतीही कृती आता केली जाणार नाही. यामुळेच जागावाटपाच्या संवदेनशील मुद्द्याला आताच हात घातला जाणार नाही. पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, पंजाब या चार विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमधील जागावाटपाचा तिढा सोडविणे कठीण आहे. यामुळेच जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा केली जाईल. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती नेमून त्या माध्यमातून विचारविनिमय करण्याची योजना आहे.
विरोधकांची रणनीती काय असावी, भाजपच्या प्रचाराला कसे उत्तर द्यायचे, जास्तीत जास्त विरोधकांना एकत्र आणणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.