दयानंद लिपारे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊन दीड महिन्याच्या अवधी होत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामांचा धडाका लावला आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी, जिल्हा पर्यटन विकासासाठी ९०० कोटीची केंद्राकडे मागणी, शेंडा पार्क येथील १हजार कोटी खर्चाचे अद्यावत रुग्णालयाची उभारणी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राची उभारणी अशा घोषणांचा सुकाळ सुरु आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांची कोटीच्या कोटी उड्डाणे डोळे दीपवणारी ठरली असली तरी कमी काळात ते पूर्ण करण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कागल विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा,कामगार, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण अशा विविध खात्यांचे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पडल. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवण्याची त्यांची दीर्घकाळाची अपेक्षा राज्यातील नव्या सत्ता समीकरणाने सफल झाली. मुश्रीफ तब्येतीने तसे तगडे. कामाची पद्धती तशीच दणकट. त्यामुळे कोणत्याही खात्याची जबाबदारी निभावताना धडाधड घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता होण्यासाठी पिच्छा पुरवायचा; हा त्यांच्या कामाचा खाक्या. कोल्हापूरचे पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यावर हाच शिरस्ता ते पुढे नेताना दिसत आहेत. यामुळेच की काय त्यांनी एकाहून एक एक घोषणांचा वर्षाव सुरु केला आहे. त्याही थोड्या- थोडक्या नव्हे तर थेट तिहेरी आकड्यातल्या कोटीची उड्डाणे सांगणारी.

हेही वाचा… समीर भुजबळ की राखी जाधव, कोण बाजी मारेल ?

मंदिरांचा विकास

कागल मतदारसंघात शंभरावर मंदिरे उभारून मंदिरवाले बाबा अशी ओळख निर्माण केलेल्या मुश्रीफ यांनी आता जिल्ह्यातील मंदिराच्या विकासाकडे लक्ष पुरवले आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचा विकास आराखड्याच्या आजवर कित्येक घोषणा झाल्या आणि त्या हवेत विरल्या. मुश्रीफ यांनी महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटीचा निधी मिळणार असल्याचे सांगितले आहे. केवळ घोषणा न करता हा निधी दसऱ्यापूर्वी येणार असल्याचे सांगितले आहे. घोषणा खरेच प्रत्यक्षात उतरणार का, हे समजण्यास आठवड्याभराचा कालावधी आहे. शिवाय, यापूर्वीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील ४२ कोटीच्या बहुमजली वाहनतळ, भक्त निवासाचे काम जागा बदल करून होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबा हे कोल्हापूरकरांच्या आस्थेचे विषय. या दोन प्रमुख मंदिरांसह जिल्ह्यातील पन्हाळा, रांगणा, विशाळगड, पारगड आदी किल्ल्यांच्या विकासासाठी ९०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे.यासाठी कोल्हापूरशी नाळ असलेले गोवा येथे वास्तव्यास असणारे केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. या माध्यमातून या पर्यटन स्थळांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती, परिसर विकास केला जाणार आहे. खेरीज, जिल्ह्यातील ६ राज्य स्मारकाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मधून १३. ५० कोटी रुपये खर्चास त्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.

हेही वाचा… हिंदुत्व आणि हिंदू संघटनांवर स्वामी प्रसाद मौर्य यांची टीका; समाजवादी पक्षाची यामागे रणनीती काय?

कोल्हापूरकरांच्या आरोग्याकडे लक्ष

वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष पुरवले आहे. यातूनच शेंडा पार्क परिसरात ३० एकरात १हजार कोटी खर्चाचे ११०० खाट क्षमतेचे अद्यावत रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यामध्ये ६०० खाट,सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग ,२५० खाटांचे कर्करोग रुग्णालय आणि २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी असे वर्गीकरण आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निमंत्रित केले जाणार असून डिसेंबरमध्ये भूमिपूजनाचा बार उडवण्याच्या तयारीत मुश्रीफ आहेत. कोल्हापूरच्या शासकीय सीपीआर ( छत्रपती प्रमिला राजे ) रुग्णालयात विविध प्रकारच्या पायाभूत कामांसाठी ४३ कोटी रुपयांची कामे हाती घेतले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. त्याचे विभागीय केंद्र कोल्हापुरात व्हावे ही मागणी प्रलंबित होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ६० वैद्यकीय महाविद्यालयच्या कामाचे सुसूत्रीकरण कोल्हापुरात या विद्यापीठाचे विभागीय केंद्र झाल्याने होणार असल्याने प्रशासकीय कामासाठी नाशिकला हेलपाटे घालावे लागणार नाहीत. हे विभागीय केंद्र सुविधायुक्त व्हावे यासाठी मुश्रीफ यांची पावले पडत आहेत. याबाबत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील गतिमान कार्यपद्धतीमुळेच अल्पावधीतच कोल्हापूर विभागीय केंद्र साकारत आहे. यामुळे या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा त्रास कमी होणार आहे, अशी टिपणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केली आहे. दिवंगत आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांच्या आरोग्य सुधारणांच्या कामाचा झपाटा लावला आहे.

हेही वााचा… Maharashtra News Live : जमीन हस्तांतरणाचं प्रकरण मला फारसं माहित नाही, मीरा बोरवणकर यांचा ग्रह झाला असावा-पृथ्वीराज चव्हाण

घोषणा प्रत्यक्षात येणार का ?

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महालक्ष्मी मंदिर, शाहू मिल, कोल्हापूर पर्यटन असे प्रकल्प थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णयाच्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्यातली एकही काम पुढे सरकले नाही. त्यामुळे मावळत्या पालकमंत्र्या प्रमाणे केवळ घोषणा न करता त्याची कृतीशील अंमलबजावणी; तीही वर्षभराच्या आत करण्यामध्ये मुश्रीफ यांच्या राजकीय नेतृत्वाचा कस लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development announcement by hasan mushrif in kolhapur but when will it come in reality print politics news asj