सौरभ कुलश्रेष्ठ

हनुमान चालिसा पठण व जागो हिंदू या गीतातून उत्तर भारतीयांच्या प्रादेशिक- धार्मिक मानसिकतेला हात घालून त्यांना चेतवणे आणि त्याचवेळी मुंबईतही हिंदुत्वाचे रक्षक शिवसेना व ठाकरे नाही तर भाजपच हे ठसवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपल्या भाषणातून केला. कट्टर हिंदुत्वाची झिंग निर्माण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर हल्ला चढवत शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष आता उद्धव विरुद्ध देवेंद्र या व्यक्तीगत पातळीवर उतरल्याचेही त्यातून अधोरेखित झाले.

हनुमान चालिसा आणि भोजपुरी भाषेतून संवाद

भाजपतर्फे हिंदी भाषी महासंकल्प सभा गोरेगावातील नेस्को मैदानावर रविवारी पार पडली. त्याआधी शनिवारी वांद्रे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यात ठाकरे यांनी भाजप आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचे पडसाद रविवारच्या फडणवीस यांच्या सभेत उमटणार हे स्वाभाविकच होते. उत्सुकता होती ती फडणवीस नेमकी मांडणी काय व कशी करणार याची. हनुमान चालिसा पठण-भोजपुरी भाषेतून संवाद आणि अब तो भगवा लहराएगा पुरे हिंदुस्थानपर अशी घोषणा करताना ओवेसी व औरंगजेबाविरोधात अत्यंत जहाल भाषा यातून आधीच हिंदुत्वाकडे झुकलेल्या उत्तर भारतीयांच्या प्रादेशिक व धार्मिक मानसिकतेला साद घालत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित श्रोत्यांचे रूपांतर कट्टर हिंदुत्ववादी जमावात करून टाकले. त्यातून उत्तर भारतीय मतदारांवरील भाजपची पकड घट्ट केली. फडणवीस यांचे भाषण व समारोपाच्या जागो हिंदू गीतानंतर झालेला सभेवरील परिणाम पाहून भाषण संपताच आमदार आशीष शेलार यांनी पुढे होत फडणवीसांशी केलेले हस्तांदोलन बोलके होते. 

सत्तासंघर्ष वैयक्तिक झाल्याचे संकेत

आपल्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस यांनी हिंदुत्वाचा वापर केला. त्याचप्रमाणे राजकीय प्रतिस्पर्ध्याविरोधात असंतोष संघटित करण्यासाठी वेगळा मुद्दा वापरावा लागतो याचे नियोजनबद्ध सूत्र फडणवीस यांच्या भाषणात दिसले. पालघरमधील साधूंची हत्या, ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवून गेला या मुद्द्यांच्या आधारे ठाकरेंच्या हिंदुत्ववादीप्रतिमेवर प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी तो असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत शिवसेना व ठाकरे हे हिंदुत्वाचे रक्षक असल्याची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेवर फडणवीस यांनी हल्ला चढवला. अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो असे सांगत गोळ्या-लाठ्यांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला. मी जमिनीशी-सामान्य लोकांशी जोडलेला कार्यकर्ता आहे म्हणून या स्थानापर्यंत आलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलो नाही यातून आपण सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहोत तर उद्धव ठाकरे हे राजमहालात बसून राजकारण करणारे आहेत, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. ठाकरे सरकारचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही हा इशारा आता हा सत्तासंघर्ष वैयक्तिक झाल्याचे संकेत देणारा व आगामी काळात तो आणखी टोकदार होत जाणार हे स्पष्ट करणारा होता. 

मराठी मतदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे हे विधान करत मराठी मतदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. 

Story img Loader