महेश सरलष्कर

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दोन दिवसांच्या दिल्लीदौऱ्यावर येत असून सत्तांतरनाट्यांनंतर या द्वयींची ही पहिलीच राजधानीभेट आहे. या दौऱ्यात शिंदे-फडणवीस ‘’महाशक्ती’’चे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार, शिवसेनेवरील पक्षीय वर्चस्व, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान अशा कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याची अपेक्षा आहे. शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतील.

काँग्रेसप्रमाणे आता भाजपमध्येही राज्यातील निर्णय दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच घेतले जातात. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी शहा आणि नड्डा यांची भेट घ्यावी लागणार आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची शिफारस आपणच भाजपच्या नेतृत्वाला केल्याचे विधान फडणवीस यांनी नागपूरमध्ये केले होते. मात्र, केंद्रीय स्तरावर भाजपमध्ये वेगळीच चर्चा केली जात होती. ‘’मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी श्रेय घेतले जाते, त्यांनी ते घ्यावे’’, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. काहींच्या मते, राज्यातील सत्तांतरनाट्य गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घडवून आणले होते. यासंदर्भातील निर्णय शेवटच्या क्षणी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले जात होते! भाजपमध्ये फडणवीसांच्या श्रेयवादावर परस्परविरोधी मते व्यक्त होत असल्याने शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपमधील कोणाला संधी मिळणार, याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी वा शनिवारी सकाळी शिंदे-फडणवीस यांच्या अमित शहांशी होणाऱ्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचे हे निश्चित होणार आहे. शिंदे गटाला १४ तर, भाजपला २८ मंत्रिपदे देण्याच्या सूत्रावरही शहा-नड्डांशी चर्चा केली जाणार आहे. शिंदे गटातील कोणत्या सदस्याला मंत्रिपदाची संधी दिली जाईल याचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घेता येईल मात्र, भाजपमधून मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, हा प्रमुख मुद्दा शहा-नड्डा यांना सोडवावा लागणार आहे.

राज्यात २०१९मध्ये विधानसभा निवडणुकाआधी अन्य पक्षातून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे. शिवाय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड अशा निकटवर्तीय नेत्यांनाही मंत्रिमंडळात सामील करून घेण्याबाबत फडणवीस आग्रही आहेत. भाजपचे आशिष शेलार, चंद्रकांत बावनकुळे आदी नेत्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा असली तरी, त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे, यावरही विचार करावा लागणार आहे. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी तिहेरी रस्सीखेच सुरू झाली असल्याने शिंदे-फडणवीस यांच्यासाठी शहा-नड्डा भेट महत्त्वाची असेल.

शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ठाणे व नवी मुंबईतील बहुतांश नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून आनंदराव अडसूळ यांच्यासारखे शिवसेनेचे जुने-जाणते नेत्यांनीही उद्धव ठाकरेंचा हात सोडून दिला आहे. शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जाते. मात्र, शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी गावागावात संघटनेमध्ये फूट पाडणे गरजेचे आहे. शिवसेनेतील संभाव्य फुटीला गती कशी द्यायची, यावरही या भेटीत खल केला जाऊ शकतो. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू १४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. या भेटीगाठीसंदर्भातही शिंदे-फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ‘’सल्ला’’ दिला जाऊ शकतो.

राज्यातील सत्तांतरनाट्याचे कर्ता-करविता अमित शहा असल्याने शिंदे-फडणवीस यांनी पक्षीय नेतृत्वाची भेट घेणे अपेक्षित आहे. पण, कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर दिल्लीत येऊन पंतप्रधानांची भेट घेत असतो. राजशिष्टाचार आणि परंपरेचा भाग म्हणूनही एकनाथ शिंदे दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. भाजप नेहमीच ‘’डबल इंजिन’’ सरकारांचा आग्रह धरते. अडीच वर्षांनंतर महाराष्ट्रातही ‘’डबल इंजिन’’ सरकार स्थापन झाले असून राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे साह्य आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही शिंदेंची मोदी यांच्याशी होणारी भेट महत्त्वाची असेल.

Story img Loader