मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास नेतृत्व फडणवीस यांच्याकडे सोपविण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथील प्रचारसभेत सांगितले. फडणवीस यांची इच्छा, असा उल्लेख पंतप्रधानांनी केल्याने राजकीय वर्तुळात त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विजयी करण्याचे राज्यातील जनतेने ठरविले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्याने त्यालाही वेगळा पदर आहे. ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे, असे मला जाणवल्याचे शहा यांनी म्हटले आहे. मोदी किंवा शहा यांनी राज्यातील प्रचार दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांच्याबद्दल संकेत दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटात साहजिकच चलबिचल होणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा >>>अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांमध्ये चढाओढ आहे. शिंदे यांनी अडीच वर्षांत चांगली कामगिरी करून दाखविल्याने त्यांनाच पुन्हा ही जबाबदारी मिळावी, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. तशीच कृती अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस फोडून करून दाखविली आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे. तर फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी पक्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis applauded by narendra modi amit shah print politics news amy