नागपूर : विधान परिषदेवर आपले विश्वासू सहकारी संदीप जोशी यांची वर्णी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जोशी यांच्यामुळे जिल्ह्यातील भाजपची आमदार संख्याही ८ वरुन ९ वर गेली असून यात बहुतांश आमदार हे कट्टर फडणवीस समर्थक म्हणून ओळखले जातात.

नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत. त्याच शहरातील सहा आणि ग्रामीणमधील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शहरात आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी चार अशा एकूण ८ जागा मिळाल्या. यात खुद्द फडणवीस यांच्या जागेचाही समावेश आहे. विधान परिषदेवर जिल्ह्यातून दोन आमदार होते. ते दोघेही विधानसभेवर निवडून गेले, त्यापैकी एका जागेवर फडणवीस समर्थक संदीप जोशी यांची वर्णी लागली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या आठवरून ९ वर गेली आहे.. यापैकी ७ आमदार हे कट्टर फडणवीस समर्थक आहेत.

नागपूर भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानणाराही एक मोठा वर्ग आहे. पूर्वी (२०१४ च्या आधी) पक्षात गडकरी यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्या काळात गडकरी समर्थक आमदारांचीच संख्या अधिक होती. त्यात विद्यमान आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही आमदारांचा समावेश होता. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले अनिल सोले असो किंवा शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार ना.गो. गाणार असो हे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जात होते. फडणवीस यांचे राजकारणही त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित होते. ते इतर ठिकाणी लक्ष घालत नव्हते.२०१४ नंतर आता चित्र बदलले. २०१४ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्याच नेतृत्वात भाजप-सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या राजकारणाच्या कक्षा रुंदावत गेल्या. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना डावलून आपले समर्थक मोहन मते यांना उमेदवारी दिली. कामठीतून नवीन उमेदवार देऊन फडणवीस यांनी जिल्ह्यावर आपली पकड ठेवण्यास सुरूवात केली. २०२४ च्या निवडणुकीतही शहर आणि ग्रामीणच्या तिकीट वाटपात फडणवीस यांचाच वरचष्मा होता. भाजपने १२ पैकी ११ जागा लढवल्या त्यापैकी फक्त पश्चिम नागपर व उमरेडच्या जागेवर गडकरी समर्थकाला उमेदवारी मिळाली होती. या दोन्ही ठिकाणी भाजप पराभूत झाली होती.

सध्या. शहरातील चार आमदारांपैकी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, मध्य नागपूरचे प्रवीण दटके, कट्टर फडणवीस समर्थक मानले जातात. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची ओळख गडकरी समर्थक म्हणून होती, त्यांनीही फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले आहे. ग्रामीणमधील चार आमदारांपैकी सावनेरचे आमदार आशीष देशमुख, काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर आणि कामठीचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस समर्थक मानले जातात. हिंगण्याचे आमदार समीर मेघे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचेही फडणवीस यांच्याशी उत्तम संबध आहे. नव्याने विधान परिषदेवर जात असलेले संदीप जोशी यांची ओळखच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी अशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आठ आमदारांमध्ये फडणवीस यांनाच मानणारे अधिक आमदार असल्याने त्यांची जिल्ह्यातील राजकारणावरही पकड अधिक घट्ट झाली आहे,

Story img Loader