उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे तोंडघशी पडले आहेत. शिवसेना फुटीनंतर होणारी ही निवडणूक अटीतटीची होणार, अशी वातावरण निर्मिती करून पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचे कारण काय, हे आधीच का केले नाही, भाजपने पराभवाला घाबरून हा निर्णय घेतला का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा… रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवेंना झटका

भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली आणि दोनच दिवसांनी सोमवारी ती मागे घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र आणि उद्धव ठाकरे यांनी ‘ सामना ‘ मधून केलेले आवाहन यामुळे भाजपची भूमिका कशी बदलली, असा सवाल विचारण्यात येत आहे. पटेल यांना उमेदवारी देण्यास प्रदेश सुकाणू समितीतील नेत्यांचे अनुकूल मत नव्हते. तरीही आशिष शेलार आग्रही होते व पटेल यांच्याऐवजी दुसरा उमेदवार भाजपकडेही नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असूनही फडणवीस यांनी पटेल यांना उमेदवारी देण्याचे एकप्रकारे नाईलाजाने मान्य केले. मुरजी पटेल यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर झाली. शेलार यांनी मात्र दहा-बारा दिवस आधीच ती जाहीर करून निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही केले होते.

हेही वाचा… पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत माघारीची भाजपवर नामुष्की….

ॠतुजा लटके यांचा महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने दणका दिल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते व जनमानसातही रोष होता. निवडणूक झाली असती, तर मोठा पराभव स्वीकारावा लागेल आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षप्रतिमेला धक्का बसेल, अशी भूमिका फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली. शेलार यांनी मात्र निवडणूक लढविण्याची भूमिका घेत पटेल यांचा अर्ज मागे घेण्यास विरोध केला. फडणवीस यांनी रविवारी रात्री आशिष शेलार, पटेल आणि केंद्रीय सरचिटणीस व प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यावर पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा… आमदार अनिल बाबर यांनी काढले गोपीचंद पडळकर यांचे ‘संस्कार’!

पटेल हे शेलार यांचे विश्वासू असून त्यांच्यामुळेच पटेल यांना उमेदवारी मिळाली. राज ठाकरे व फडणवीस यांचे मैत्रीसंबध आहेत. त्यांच्यातील चर्चेनंतरच राज ठाकरे यांनी उमेदवारी मागे घेण्याचे पत्र लिहिले आणि शरद पवारांनीही तसे आवाहन केल्यानंतर भाजपमधील चक्रे फिरली, असे भाजपमधील उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. पटेल हेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असे दावे आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी केले होते. लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये आणि ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले जावे, यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. शेलार यांनी बरीच टीकाटिप्पणी केली होती. मात्र अखेर पटेल यांची उमेदवारी मागे घेतली गेली व लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
विद्यमान आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असताना ती बिनविरोध करावी ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचा युक्तिवाद भाजपच्या नेत्यांनी मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेताना केला. मात्र महाविकास आघाडीतील पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर दिवंगत आमदारांच्या कुटुंबातील सदस्य पोटनिवडणुकीला उभे असताना भाजपाने दोन्ही जागा लढवल्या होत्या हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत माघार घेताना भाजप नेत्यांनी केलेला युक्तिवाद हा फसवा आणि हास्यास्पद ठरला आहे. उलट भाजपने निवडणूक रिंगणातून पळ काढल्याची टीका सुरू झाली आहे.

हेही वाचा… पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत

ही निवडणूक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लढवायची नव्हती तर मग आधी उमेदवारी अर्ज दाखल करून हात दाखवून अवलक्षण केले कशासाठी? अशी चर्चा भाजपमध्ये रंगली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis let down ashish shelar in andheri election print politics news asj