चंद्रशेखर बोबडे
राजकीय विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात पातळीसोडून बोलण्यात भाजप नेते आघाडीवर आहेत. पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास प्रसिद्ध आहे. पण शनिवारी त्यांनी नागपुरात उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीवर काहीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले. फडणवीस यांनी ही भूमिका पक्षांतील वाचाळवीरांना आवर घालण्यासाठी घेतली की ठाकरेंवर केलेली टीका ही त्यांच्याच पत्थ्यावर पडते हे लक्षात आल्यामुळे घेतली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शनिवारी फडणवीस हे त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. पत्रकारांनी त्यांना सध्या चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत विचारले. यात ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला लक्ष्य केले आहे. त्यामुळे फडणवीस त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने जशास तसे थाटात उत्तर देईल,अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ” ठाकरे यांच्या मुलाखतीत प्रतिक्रिया देण्यासारखे काहीच नाही” असे सांगून बोलणे टाळले. विशेष म्हणजे ठाकरे यांनी बोलणे आणि त्यावर फडणवीस यांची तत्काळ प्रतिक्रिया न येणे असे कधी होत नाही. अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास ठाकरे यांच्या नागपूरच्या सभेचे देता येईल. या सभेत ठाकरे यांनी फडणवीस यांना ते नागपूरसाठी’ कलंक’ आहे असे म्हंटले होते . त्यावर फडणवीस यांच्याकडून तत्काळ प्रतिक्रिया आली व महाराष्ट्रासाठी ठाकरेच कसे कलंकित आहे. त्यांना कलंकित काविळची बाधा झाल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा… नव्या तालुका निर्मितीवरून भाजप आमदारांमध्येच वाद

हेही वाचा… पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांचीच छाप

भाजपमध्ये फडणवीस यांची प्रतिक्रिया आली की पक्षांतील वाचाळवीरांना हुरूप येतो. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यात आघाडीवर असतात. त्यांनी ठाकरेंवर आरोप करतांना कलंकित शब्दाचा तीस वेळा वापर केला. यामुळे यांच्या उलट प्रतिक्रिया आल्या त्यातून ठाकरेंविषयीच सहानुभूती निर्माण झाली. असाच अनुभव भाजपला इतर अनेक प्रकरणांत आल्याचे पाहायला मिळाले आहे. मणिपूर प्रकरणात सर्वच बाजूंनी भाजपवर टीका होत असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्यावरूनही पक्षाच्या प्रतिमेला तडे गेले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने संयमी भूमिका घेतल्याचे बोलले जाते. ठाकरेंच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देऊन त्याची दखल घेण्यापेक्षा त्याला अनुल्लेखाने मारणे अधिक सोयीचे असल्याने फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणं टाळले असावे, असे बोलले जात आहे. पण त्यांच न बोलणे ही चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader