Devendra Fadnavis : १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठे, महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा इतिहास कधीही विसरणार नाही. कारण पानिपतचं युद्ध आपण जिंकू शकलो नाही हाच तो दिवस होता. पानिपत ही आपल्या देशाच्या आणि मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम आहे. मात्र त्याचवेळी ती मराठ्यांच्या शौर्याचीही गाथा आहे. कारण मराठे जे काही लढले, ज्या परिस्थितीत लढले त्याला काहीही तोड नाही. याच पानिपतच्या वीरभूमीला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यांनी पानिपतच्या लढाई बाबत गौरवोद्गार काढले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी पानिपतबाबत काय गौरवोद्गार काढले?
पानिपत ही मराठी माणसाची भळभती जखम आहे. पण त्याचवेळी मराठी माणसाचा अभिमानही पानिपत आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवलं, ज्या विपरीत परिस्थितीतही मराठे लढले ती म्हणजे युद्धाच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी गोष्ट पाहण्यास मिळते. या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठे सैनिक या युद्धात वीरगतीला गेल्यानंतरही मराठ्यांनी कधीही हार मानली नाही. त्यानंतर दहा वर्षांत पुन्हा एकदा संपूर्ण भारतावर भगवं राज्य प्रस्थापित केलं आणि दिल्लीही जिंकून दाखवली. त्यामुळे मराठ्यांची वीरता आणि शौर्य आहे ते अतुलनीय आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि मराठ्यांनी देशभरात पसरवलं-फडणवीस
छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याला त्यांच्यानंतर छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण भारतात पसरवण्याचं काम आमच्या मराठ्यांनी केलं. पानिपत ही अशी लढाई आहे की ज्या लढाईत तांत्रिकदृष्या पराभव झाला तरीही मराठे कधीही हरले नाहीत. त्यांनी आपलं शौर्य सातत्याने इतकं वाढवलं की भारतावर कधीही आक्रमणं करण्याची हिंमत कुणी केली नाही. या शौर्य भूमिला वंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. खऱ्या अर्थाने शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मी आभारा मानतो. कारण आमचा इतिहास त्यांनी जिवंत ठेवला. मातृभूमीसाठी धारातिर्थी पडलेल्या मराठ्यांना या ट्रस्टच्या माध्यमातून आदरांजली दिली जाते. त्यातून आमचं शौर्य आहे, विजिगिषू वृत्ती आहे याचं संवर्धन करण्याचं काम ही ट्रस्ट करते आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार जी मदत लागेल ती करणार
आत्ताच विश्वस्त मंडळाशी माझी चर्चा झाली आहे. आम्हाला काही गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत. इथला परिसर, स्मारक या आणखी चांगल्या करण्यासाठी महाराष्ट्र सरकार जी लागेल ती मदत करणार आहे. या मंगलभूमीला वंदन करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एकत्रित आहोत तरच सुरक्षित आहोत-फडणवीस
छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्यात अठरापगड जातीचे लोक मावळे म्हणून लढले. स्वराज्य विस्तारीत करण्याचं काम त्यांनी केलं. छत्रपतींनी सामान्य माणसांमध्ये पौरुष जागृत करुन त्यांना असामान्य बनवलं मला असं वाटतं की जोपर्यंत हे आम्हाला लक्षात राहिल की आम्ही एकत्रित आहोत तरच सुरक्षित आहोत, तरच प्रगती आहे. आम्ही जातीपातीच्या गोष्टींमध्ये विभाजित झालो तर आपल्याला प्रगती करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला एकत्र आणलं तसंच भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंगा झेंड्याखाली आम्हाला एकत्र येणं ही काळाची गरज आहे.