शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. शिंदे गट-भाजपाने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. तर आगामी काळातही आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेससह महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवू अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाच्या शिवसेनेला बहाल केलेले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व सत्तासंघर्षामध्ये भाजपाच्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आम्ही शत्रू नाहीत. आम्ही फक्त वैचारिक विरोधक आहोत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे. याच कारणामुळे भाजपाच्या ठाकरे गटाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची सध्या चर्चा होत आहे. फडणवीस आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस काही प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे सर्व निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातात. २०१९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या राजकीय डावपेचात देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत राजकारणातील द्वेषभाव नष्ट व्हायला पाहिजे, असे विधान केले. “आम्ही आमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना शत्रू मानत नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राजकारणात वेगळा मार्ग निवडलेला आहे. आमचाही मार्ग दुसरा आहे. आम्ही शत्रू नसून आमच्यात फक्त वैचारिक मतभेद आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेना पक्षात पडलेली फूट ही भाजपप्रेरित होती असा आरोप केला जातो. भाजपाने प्रोत्साहन दिल्यामुळेच आमचे आमदार फुटले, असा आरोप ठाकरे गटाचे नेते करतात. असे असताना फडणवीस यांनी केलेल्या वरील विधानाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >>> अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार

देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय?

देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान केले आहे. या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तेसच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले असले तरी ‘ठाकरे’ हे नाव अजूनही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. शिवसेना या पक्षाची स्थापना, या पक्षाचा विस्तार उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी केला, याची भाजपाला जाणीव आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्याप्रती लोकांच्या मनात काही प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आहे. याचीही जाण भाजपाला आहे.

हेही वाचा >>> तिसरी आघाडी अटळ; काँग्रेसला साथ देण्यास अनेक पक्षांचा विरोध

शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून या पक्षाला ठाकरे घरण्याशी जोडले जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष समर्थपणे सांभाळला आणि वाढवला. त्यामुळे शिवसेनेचे मतदार तसेच काही कार्यकर्त्यांच्या मनात निवडणूक आयोगाने पक्षपातीपणे निर्णय दिला, अशी भावना आहे. उद्धव ठाकरे हाच मुद्दा घेऊन राजकारण करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझ्या वडिलांचा वरसा चोरला आहे, असे ठाकरे सातत्याने म्हणताना दिसत आहेत.

…म्हणून विचारपूर्वक रणनीती आखावी लागेल

राजकारणात काहीही होऊ शकते, याची देवेंद्र फडणवीस पर्यायाने भाजपाला कल्पना आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या बाजूने जनमत जाण्याची शक्यता, भाजपाने लक्षात घेतलेली आहे. म्हणूनच भाजपाने सावध पवित्रा घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने भूमिका मांडली आहे. “शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष आहे. सध्या जनभावना उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल तर त्याचा फटका भाजपाला बसू शकतो. त्यामुळे आम्हाला आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी विचारपूर्वक रणनीती आखावी लागेल,” असे भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा >>> शत्रुघ्न सिन्हांकडून पुन्हा राहुल गांधींचं कौतुक; म्हणाले, “आगामी २०२४च्या निवडणुकीत…”

‘भाजपाने हा मुद्दा मागे सोडावा’

उद्धव ठाकरे यांना धडा शिकवणे हे भाजपाचे लक्ष्य होते. आता भाजपाचे लक्ष्य पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा मागे सोडून द्यायला हवा, अशी भावना आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. याच कारणामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत,’ या विधानाला महत्त्व आले असून आगामी काळात राजकीय समीकणं बदली तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या पक्षाचे नाव आणि नवडणूक चिन्ह नसले तरी त्यांनी पुन्हा एकदा जोमाने लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन न्याय मागू अशी भावनिक भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis said uddhav thackeray aditya thackeray not my enemy what its mean prd