नागपूर : राज्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे. दक्षिण-पश्चिममध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयाचा चौकार मारण्यासाठी लढले तर काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी परिवर्तनाचा नारा देत जोरदार प्रचार केला. यंदा दक्षिण-पश्चिममध्ये ५४.५९ टक्के मतदान झाले आहे, जे २०१९ मधील ५१ टक्क्यांपेक्षा तीन टक्क्यांनी अधिक आहे. मतदानातील ही किंचित वाढ निकालात मोठा फरक पाडू शकेल काय याचे चित्र शनिवार २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकूण चार लाख ११ हजार मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघात सुमारे ३७ हजार मतदारांची वाढ झाली. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती. मतदानाच्या टक्केवारीत देखील महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा आघाडी घेतली. या मतदारसंघातील दोन लाख दोन हजार पुरुषांपैकी एक लाख ११ हजार पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दोन लाख आठ हजार महिला मतदारांपैकी एक लाख १३ हजार महिलांनी मतदान केले. महिला मतदारांची संख्या सुमारे अडीच हजाराने जास्त होती. त्यामुळे या लाडक्या बहिणींची मतदानरूपी ओवाळणी कुणाकडे जाते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा – दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक
या मतदारसंघाचा प्रभागनिहाय विचार केला तर सर्वाधिक मतदान जयताळा, एकात्मतानगर परिसरात बघायला मिळाले. दलितबहुल भाग असलेल्या जाटतरोडी, रामबाग, शताब्दी चौक परिसरातही मतदानांमध्ये उत्साह होता. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या धंतोली, काँग्रेसनगर परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे बघायला मिळाले. ओबीसीबहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघातील मतदार चौथ्यांदा फडणवीस यांना विजयाचा टिळा लावतात की परिवर्तनाचा कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.