मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पाठिंबा देण्याचीच भूमिका भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचे प्रमाण मोठे असून त्यांना समजावण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होतील, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी एका जागेसाठी पाठिंबा मागितला होता. तो त्यांना दिला पाहिजे, अमित ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवार देऊ नये, असे भाजप व शिंदेंचेही मत होते. पण त्यांना काही अडचणी आल्या. महायुतीने जर उमेदवार दिला नाही, तर ती मते उद्धव ठाकरे गटाकडे जातील, असे शिंदे यांच्या काही नेत्यांचे मत असल्याने त्यांनी उमेदवार दिला आहे. पण यासंदर्भात आम्ही एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी नमूद केले.

हेही वाचा :मविआत सात ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती? तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार

सिंचन गैरव्यवहारप्रकरणी आपली चौकशी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशाने सुरू झाली होती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले आहे. यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, आर. आर. पाटील आज हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणे किंवा ज्या गोष्टींना ते उत्तर देऊ शकत नाहीत, अशा गोष्टींवर बोलणे मला प्रशस्त वाटत नाही. पण अजित पवार यांची चौकशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातच सुरू झाली होती, असे त्यांनी सांगितले.