उमाकांत देशपांडे
मुंबई : भाजपने पियूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना कोट्यापेक्षा बरीच अधिक म्हणजे ४८ मते मिळतील, अशी व्यवस्था करूनही तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनाही निवडून आणले. भाजपने संख्याबळापेक्षा अधिकची मते मिळविताना महाविकास आघाडीची ७ मते फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना यशस्वी ठरली. महाविकास आघाडीला गाफील ठेवून त्यांच्याबरोबर असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षांची मते फडणवीस यांनी फोडली.
भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले १०६ आमदार आणि मनसेचे राजू पाटील, रवी राणांसह काही अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता भाजपकडे एकूण ११६ चे संख्याबळ होते. राज्यसभेवर विजयासाठी साधारणपणे ४१-४२ चा कोटा विजयासाठी आवश्यक होता. म्हणजेच भाजपच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी १२६ पहिल्या पसंतीची मते आवश्यक होती. त्यापेक्षा १० मते कमी असतानाही तिसरा उमेदवार देण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांनी खेळली. महाविकास आघाडीसमवेत जाण्याची शक्यता असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षांची ७ मते फोडून जादा मतांची बेगमी करण्याची तजवीज फडणवीस यांनी केली. समाजवादी पक्ष, एमआयएम, बहुजन विकास आघाडी व काही अपक्ष महाविकास आघाडी बरोबर जातील, असे दावे करण्यात येत होते. समाजवादी पक्ष आणि एमआयएम यांची जाहीर भूमिका भाजप विरोधातील असल्याने त्यांची मते महाविकास आघाडीला जातील, असा अंदाज होता.
पण लहान पक्ष व अपक्ष यांची मते मतदान करताना प्रतोद किंवा निवडणूक प्रतिनिधीला दाखविण्याची गरज नसल्याने फडणवीस यांनी खेळी खेळली होती. गिरीश महाजन यांना पाठवून हितेंद्र ठाकूर यांना भाजपकडे वळविण्याचे प्रयत्न केले. तर आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीच्या तंबूत असलेल्यांनाही काही दूत पाठवून आधीच संपर्क साधण्यात आला होता. करोनाने आजारी व घरी विलगीकरणात असलेल्या फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या काही आमदारांशी व लहान पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांचे मन वळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
मतांचे गणित जमविले
भाजपने ४२ चा किमान कोटा गृहीत धरला तरी गोयल व बोंडे यांना अधिकची सहा मते मिळतील, अशी व्यवस्था केली होती. त्यांनी अपेक्षित कोटा पूर्ण केल्यावर त्यांची अतिरिक्त मते आणि भाजप व अन्य आमदारांची दुसऱ्या प्राधान्यक्रमाची मते महाडिक यांना द्यावी, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या होत्या. कोणत्या उमेदवाराला कोणत्या आमदाराने पहिल्या व दुसऱ्या पसंतीक्रमाचे मत द्यायचे, हे ताज विवांता हॉटेलमध्ये प्रशिक्षण वर्ग घेवून आमदारांना समजावून सांगण्यात आले होते, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. ज्या मतांची बेगमी बाहेरून करण्यात आली होती, त्यांची मते गोयल व बोंडे यांनाही देण्याच्या सूचना देण्यात आल्याने आणि महाडिक यांच्यासाठी भाजप व विश्वासातील अपक्ष मतांची व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही धोका पत्करायचा नसल्याने बाहेरून करावयाच्या मतांची विभागणी तीनही उमेदवारांमध्ये केल्याने गोयल व बोंडे यांना कोट्यापेक्षा अधिक मते मिळाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.